राजेश चव्हाण

रत्नागिरी :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांचा बालेकिल्ला असलेल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपचे राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी दावा ठोकला आहे. भाजप शिंदे गटाला जठारांच्या माध्यमातून शह देत असल्याची चर्चा कोकणात सुरू झाली आहे.

ठाणे जिल्ह्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य आहे. ठाणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे खासदार आहेत. कोकणातील सहा पैकी तीन लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे खासदार आहेत. रायगड – रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीचे खासदार आहेत. या जागा वगळून ठाणे व रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. या मागे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाढता पाठिंबा असताना, माजी आमदार जठार यांनी लोकसभा मतदार संघासाठी शड्डू ठोकले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांची पकड आहे. खा. विनायक राऊत यांना किरण सामंत टक्कर देऊ शकतात, अशी स्थिती असताना अचानक मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची लोकसभा जागांसाठी मागणी याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात माजी आमदार जठार यांनी गेली पाचसहा वर्ष कोकणातील भाजप तळागाळात जाऊन काम करीत आहे.

लोकसभा मतदार संघातील १८७५ बुथपर्यंत जाऊन बुथ कमिट्या, अध्यक्षापासून पंचायत समिती, जिल्हा परिषदपासून लोकसभा मतदार संघात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काम केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण- संगमेश्वर, लांजा-राजापूर मतदार संघात दौरे झाले असून आता रत्नागिरी विधानसभा मतदार संघात दौरे सुरू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here