मालवण, पुढारी वृत्तसेवा :  मालवण शहरातील दांडी आणि चिवला बीच या समुद्र किनाऱ्यावर बुधवारी (दि.१५) पिठाच्या गोळ्यासारखे पदार्थ मच्छिमारांना आढळून आल्याने किनारपट्टी भागात खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत त्या पदार्थांची पाहणी केली. समुद्र किनाऱ्यावर आढळलेला हा पदार्थ देवमाशाची उलटी सदृश्य पदार्थ असल्याची आवई उठली गेल्यानंतर पोलिसांनी नेमका हा पदार्थ कोणता असावा याची खातरजमा करण्यासाठी बी. डी. एस व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले होते. दरम्यान, या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेल्या पदार्थात काही संशयास्पद बाबी आढळेलेल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान , किनाऱ्यावर सापडलेला हा पदार्थ बोटीच्या कामात सिलिंगसाठी वापरला जाणारा पॉली ऍनाईल क्लोराईड हा पदार्थ असल्याचे माहिती समोर आली आहे. मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ही माहिती दिली असून हा पदार्थ पुढील तपासणीसाठी कोल्हापूर येथे न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितले.

मालवण शहरातील दांडी येथील योगेंद्र खराडे हे काल सकाळी आपल्या नौकेतून जगदीश खराडे, विवेकानंद खराडे, ईश्वर खराडे, रोहन सरमळकर यांच्या समवेत समुद्रात मासेमारीसाठी गेले असता किनाऱ्यावर परतत असताना त्यांना समुद्रात पिठाच्या गोळ्या प्रमाणे दिसणारा पदार्थ दोन तुकड्या मध्ये तरंगताना दिसून आला. हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असावी या अंदाजाने मच्छिमारांनी तो पदार्थ किनाऱ्यावर आणत याबाबत वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी श्रीकृष्ण परीट, वनकर्मचारी अनिल परब आदींचे पथक दांडी समुद्रकिनारी दाखल झाले. पाहणीअंती पथकाने रितसर पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here