
देवगड, पुढारी वृत्तसेवा : देवगड तालुक्यातील युवकाचा धारदार शस्त्राने वार करुन निर्घुनपणे खून करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास मुणगे-मसवी रस्त्यावर घडली. प्रसाद परशुराम लोके (वय ३१) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञान मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोबाईल कॉल माहितीवरून मारेकर्यांपर्यंत पोहचू असा विश्वास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी व्यक्त केला.
याबाबत अधिकची माहिती अशी की, प्रसाद हा मिठबांव येथे महा-ई-सेवा केंद्र चालवित होता. तसेच त्याचा भाड्याने गाडी देण्याचा व्यवसाय होता. रविवारी रात्रीच्या सुमारास त्याला गाडी भाड्याने हवीय कुडाळला जायचे आहे, असा फोन आला होता. यामुळे प्रसाद सोमवारी पहाटे उठून त्याचा मालकीची व्हेगनार कार घेवून भाडे नेण्यासाठी मसवी मार्गे गेला. दरम्यान, सोमवारी पहाटे मिठबावचे सरपंच भाई नरे यांना मसवी येथे व्हॅगनार गाडीचा अपघात झाला आहे, असा फोन आल्यावर ते आपल्या सहकार्यांसमवेत गाडी घेवून त्या ठिकाणी गेले. यावेळी मुणगे-मसवी रस्त्यावर व्हॅगनार गाडी दरवाजा उघडलेल्या स्थितीत उभी असल्याचे त्यांना दिसले. तर गाडीमधील व्यक्ती रक्तबंबाळ स्थितीत दिसली. त्यांनी देवगड पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे हे सहकार्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.यावेळी गाडीच्या बाहेर प्रसाद मृतावस्थेत दिसला. त्याच्या डोक्यावर व कपाळावर वार करून त्याचा निर्घुण खून केल्याचे निदर्शनास आले.
प्रसाद लोकेच्या वडिलांची पोलिसांत तक्रार
मयत प्रसाद याचे वडील परशुराम पांडुरंग लोके (६५) यांनी देवगड पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे. आपला मुलगा प्रसाद लोके हा त्याच्या मालकीची वॅगनर कारने त्याचा मुणगे येथील मित्राच्या माणसांना कुडाळ रेल्वे स्टेशनला सोडण्यासाठी जातो, असे सांगून गेला. मुणगे ते मसवी जाणारे रोडवरील चाफ्याची खरी या ठिकाणी रस्त्यावर अज्ञात इसमांनी गाडीच्या काचा फोडून आपल्या मुलाच्या डोकीवर कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून ठार मारले, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून अज्ञात मारेकर्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचलंत का?