पुणे – कोरोना रुग्णांना (Corona Patient) उपयुक्त ठरणाऱ्या प्लाझ्माचा (Plasma) केवळ शहरातच नव्हे तर पुणे विभागातही खडखडाट (Shortage) झाला आहे. मागणीच्या तुलनेत अवघा २०-२५ टक्के प्लाझ्मा उपलब्ध होत असल्याचे निरीक्षण आहे. प्लाझ्मा डोनेशनबाबत (Donation) असलेली उदासीनता त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. तसेच, कोरोना झालेल्या रुग्णाला पहिल्या पाच ते नऊ दिवसांत प्लाझ्मा देण्याची गरज असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. (Plasma shortage in Pune city)
कोरोना झालेल्या रुग्णाला सरसकट प्लाझ्माची गरज असते, हा गैरसमज असल्याचेही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. रुग्णाच्या परिस्थितीनुसार प्लाझ्माचा वापर करण्याचा निर्णय डॉक्टर घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अनेकदा रुग्ण अथवा रुग्णाच्या नातेवाइकांकडून प्लाझ्मा वापरण्याचा आग्रह होत आहे. त्यामुळे प्लाझ्मा मिळविण्यासाठी सध्या धावपळ वाढली आहे. त्यातच कोरोनातून रुग्ण बरे झाल्यावर २८ दिवसांनंतर ३ महिन्यांपर्यंत वैद्यकीय चाचण्या करून प्लाझ्मा डोनेशन करता येते.

Also Read: पुण्यात कोव्हॅक्सीनचे फक्त ३ हजार डोस; कोव्हीशील्ड लस संपली
स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार
प्लाझ्माची टंचाई दूर करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था सध्या पुढे सरसावल्या आहेत. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मा डोनेशनसाठी त्यांच्याकडून आग्रह केला जात आहे. तसेच प्लाझ्माची गरज असलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनाही रिप्लेसमेंटची मागणी केली जात आहे. मात्र, काही रक्तपेढ्यांकडे प्लाझ्मा असेल तर, त्यांना प्लाझ्मा मिळवून देणाऱ्या ग्रुप अथवा संस्थेकडून सांगितले गेल्यास प्लाझ्मा दिला जात आहे, असा अनुभव काही रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितला.
मागणीच्या तुलनेत प्लाझ्माचा पुरवठा कमी आहे. सुमारे २०-२५ टक्केच प्लाझ्मा सध्या उपलब्ध आहे. त्यासाठी डोनरची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. स्मिता जोशी, सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बॅंक
काही रुग्णांना प्लाझ्मा आवश्यक आहे. त्यांनाही तो मिळाला पाहिजे. त्यासाठी ब्लड बॅंकांनी रिप्लेसमेंटचा आग्रह धरू नये किंवा त्यासाठी अडवणूक करू नये.
– शंकर मुगावे, पुणे विभागीय समन्वयक
Also Read: पुणे: दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिक उपलब्ध नसल्यास कोणाला मिळणार लस?
कोरोना झाल्याचे निदान झाल्यावर रुग्णांना पहिल्या ५ ते ९ दिवसांत प्लाझ्माचा उपयोग होतो. त्यानंतर त्याचा फारसा उपयोग होत नाही. तसेच प्लाझ्मा थेरपीमुळे रुग्णाचा जीव वाचतो, असे सिद्ध झालेले नाही. उशिरा प्लाझ्मा दिल्यावर त्याचा रुग्णांना अपायही होऊ शकतो. त्यामुळे सरसकट प्लाझ्माचा वापर करणे चुकीचे आहे. म्हणूनच काही रुग्णालयांनी प्लाझ्मा थेरपीचा वापर करणे बंद केले आहे.
– डॉ. डी. बी. कदम, कोरोना टास्क फोर्स प्रमुख
कोविड प्लाझ्मा आवश्यक आहे. पण लाइफ सेव्हिंग किंवा जीवदान ठरेल, असे समजून अत्यावश्यक गरज किंवा कोविड रुग्णांना अमृत ठरेल, असा भ्रम कोणीही रुग्णांचे नातेवाईक आणि मित्र मंडळींमध्ये निर्माण करून त्यांची कोविड प्लाझ्मा मिळविण्यासाठी ससेहोलपट करू नये.
– एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर
प्लाझ्माची किंमत : ५५०० रुपये
अधिक चाचणीचे : ५०० रुपये
एकूण : ६००० रुपये
Esakal