‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’ यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज वाढदिवसमाधुरीच्या अभिनयाचे, नृत्याचे आणि हास्याचे आजही असंख्य चाहते आहेत. १९९९ मध्ये तिने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून परदेशात संसार थाटला. या दोघांना दोन मुलं आहेत. माधुरीचे चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या मुलांची प्रतिक्रिया काय असते, हे तिने एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं. “मी घराबाहेर होती आणि त्यावेळी माझ्या मुलांनी ‘कोयला’ हा चित्रपट पाहिला होता. जेव्हा मी घरी परतली तेव्हा एका मुलाच्या कम्प्युटरवर मला एक चिठ्ठी चिटकवलेली दिसली. त्यावर लिहिलं होतं, आई तू ‘कोयला’मध्ये इतकं हास्यास्पद अभिनय का केलंस?”माधुरीचा ‘गुलाब गँग’ हा चित्रपटसुद्धा तिच्या मुलांनी पाहिला होता. “चित्रपटात मी हात वर उचलून एक संवाद म्हणते असा सीन होता. त्यावरून माझ्या मुलांनी मला खूप चिडवलं होतं. बऱ्याच दिवसांपर्यंत मला त्याची नक्कल करून ते चिडवत होते”, असं माधुरीने सांगितलं. भारतात परतल्यानंतर माधुरीने ‘आजा नच ले’ या चित्रपटातून पुनरागमन केलं. त्यानंतर ‘ये जवानी है दिवानी’मधील तिचा ‘घागरा’ हा डान्स खूप गाजला. तिने ‘टोटल धमाल’ आणि ‘कलंक’ या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या.