दुर्वा या गणपतीला अत्यंत प्रिय असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे या दुर्वांशिवाय गणपती बाप्पाची पूजा कधीच पूर्ण होत नाही. खरंतर आपल्याला दुर्वांचं धार्मिक कार्यामधील महत्त्व माहित आहे. परंतु, धार्मिक महत्त्वासोबतच या दुर्वांना आयुर्वेदिक महत्त्वदेखील तितकंच आहे. दुर्वांमुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात. म्हणूनच कोणकोणत्या आजारांवर दुर्वा गुणकारी ठरतात ते पाहुयात. दुर्वा एक औषधी वनस्पती आहे. त्यामुळे पोटात जळजळ होण्यावर ती फायदेशीर ठरते असं तज्ज्ञांचं मत आहे. दुर्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्वचेशी निगडीत समस्या दूर होतात. चेहऱ्यावर मुरुम, डाग असल्यास दुर्वा आणि हळद एकत्र करुन त्याचा लेप तयार करावा. हा लेप चेहऱ्यावर लावावा. दुर्वांचा रस प्यायल्यामुळे घशाला कोरडपणे, सतत तहान लागणे या समस्या दूर होतात. हिमोग्लोबिनची कमतरता दूर होते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. ओठांच्या आतील भागात सतत फोड येत असल्यास गरम पाण्यात दुर्वा उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी ‘सकाळ ऑनलाइन’चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)