पिंपळवाडी(पुणे) : स्लोवेनिया या देशात २० मे १७३४ रोजी एका गरीब मधमाशीपालकाच्या कुटूंबात एन्टोन जान्सा या प्रसिध्द मधमाशी तज्ज्ञाचा जन्म झाला. त्यांनी मधमाशींवर केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे तसेच मधमाशीचे महत्व सर्वांना समजावे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघटनेने २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला. ही पृथ्वी सजीव राहण्यासाठी मधमाशीचे अनंत उपकार आहेत. मधमाशांमुळे पृथ्वीवरील जैवविविधता टिकून आहे. त्याचप्रमाणे मधाचेही अनेक फायदे आहेत. (World Bee Day know Importance of HoneyBee)
शेतीच्या उत्पनातही मधमाशींमुळे वाढ झाल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. एकविसाव्या शतकात शेतीत वापरणारे किटनाशके, जंगलतोड यामुळे मधमाशा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
Also Read: घरातच बसावे लागल्याने मुले वैतागली; खेळही झाले बंद
जुन्नरचे पर्यावरण अभ्यासक आकाश डोळस यांनी सांगितले की, मधमा्श्यांची उत्पत्ती ही फिलिपाइन्ससह दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये झाली असावी असा अंदाज आहे. एक अपवाद सोडून इतर सर्व मधमाश्यांची उत्पत्ती एकाच मूळ मधमाशीपासून झाली असे शास्त्र सांगते. एपिस फ्लोरिया आणि एपिस अँचड्रेनिफॉर्मिस या दोन्ही मधमाश्यांंचा उगम एकच असून इओसीन आणि ऑलिगोसीन कालखंडाच्या काठावर युरोपमध्ये मधमाशीचे जीवाश्म सापडले आहेत. तरीही याचा अर्थ युरोपमध्ये मधमाशीचा उगम झाला आहे असा काढता येत नाही. त्या ठिकाणी मधमाश्या होत्या एवढाच अर्थ त्यातून निघतो. या भागातील आणखी काहीं जीवाश्मांचा अभ्यास अजून चालू असून एपिस निआर्टिका नावाच्या मधमाशीचा जीवाश्म नेवाडामध्ये सापडलेला आहे. त्याचा काळ एक कोटी चाळीस लाख वर्षापूर्वीचा आहे.
मधमाश्यांपासून मध मिळते याचे ज्ञान ऐतिहासिक काळापासून आहे. मेण आणि मध ही उत्पादने मिळवण्यासाठी दोन मधमाश्यांच्या जाती माणसाळवल्या गेल्या त्यामध्ये एपिस मॅलिफेरा या इजिप्शियन पिरॅमिड बांधण्याच्या काळापासून माणसाळल्याची नोंद आहे. (इजिप्शियन चित्रामध्ये मधमाश्यांचे पोळे आणि त्यापासून मध मिळविल्याचे दिसते).
Also Read: १०५ वर्षाच्या ‘पहिलवाना’चा कोरोनाला धोबीपछाड

मधुमक्षिका पालन एक शेतीपुरक व्यवसाय
एपिस मेलिफेरा आणि एपिस सेरेना इंडिका या दोन मधमाश्या मधुमक्षिका पालन करणार्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आधुनिक काळातील मधमाश्या या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जेथे परागीभवन हमखास करण्याची गरज आहे, तेथे घेऊन जाण्यासाठी योग्य आहेत. अश्यामुळे उत्पादन अधिक मिळते. कर्नाटक राज्यामध्ये सूर्यफूल शेतीमध्ये मधमाश्यांच्या पेट्या व्यापारी तत्त्वावर ठराविक भाडे घेऊन ठेवल्या जातात. शेतीव्यतिरिक्त हा जोड धंदा असुन महाराष्ट्रातही अनेक शेतकरी मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करु लागले आहेत.
मधुमक्षिका पालन व्यवसायातील धोका
पाश्चिमात्य मधुमक्षिका पालन उद्योगामध्ये एक धोका सध्या उत्पन्न झाला आहे. वरवर पाहता एकाएकी मधमाश्यांची संख्या कमी होते. आणि एक पोळे टिकवून ठेवण्यासाठी जेवढ्या मा्श्यांची आवशकता आहे त्याहून कमी माश्या राहिल्या तर पोळेच नाहीसे होते. २००७ मध्ये तीस ते सत्तर टक्के मधमाश्यांची पोळी नाहीशी झाली. अपुरी प्रथिने, शेती करण्यामधील काहीं बदल किंवा अनिश्चित हवामान अशी याची तीन कारणे सांगितली जातात. उत्तर अमेरिकेत सुद्धा मधमाश्यांची संख्या एवढी कमी कधीच झालेली नव्हती. या प्रकारास ‘कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर’ असे नाव मिळाले. इस्रायली अक्यूट परजीवी विषाणूमुळे इस्राईल मध्ये मधमाश्या संपल्यात जमा आहेत.
मोबाईलच्या वापरामुळे मधमाश्यांवर होणारा परिणाम
मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी हे मधमाश्यांची संख्या कमी होण्यामागील प्रमुख कारण मानले जाते. विद्युतचुंबकीय लहरी मधमाश्यांच्या शरीरात असलेल्या ‘चुंबकीय रडार’वर परिणाम करतात. त्यामुळे दिशाहीन झालेल्या माशा गोंधळून जातात व पोळ्यापर्यंत पोहोचत नाहीत.
मधमाशीचे जीवनचक्र
मधमाशा या समुहात राहत असून एका वसाहतीमध्ये एक राणी माशी, ऋतुमानाप्रमाणे थोडे नर आणि सतत बदलत राहणारा कामकरी माश्यांचा समूह अशी पोळ्याची रचना असते. जातीप्रमाणे पोळ्याच्या राणी, नर, आणि कामकरी माश्यांची संख्या बदलते. पण या श्रेणीमध्ये सहसा बदल होत नाही.
मधमाश्यांमुळे होते फुलांचे परागीभवन
एपिस कुलातील माश्या विविध फुलातील मध गोळा करतात. त्याचबरोबर अनेक फुलांचे परागीभवन मधमाश्यांमुळे होते. एपिस मेलिफेरा परागीभवनासाठी उपयुक्त ठरली आहे. व्यावसायिक पद्धतीने एपिस मेलिफेराच्या वसाहती पिकामध्ये फुले येण्याच्या काळात ठेवल्यास उत्पन्नामध्ये तीस टक्केवाढ दिसली आहे. अब्जावधी डॉलरचे कार्य मधमाश्या मोफत करीत असतात
असे करतात मधमाश्या स्वत:चे संरक्षण
समूहाने राहणाऱ्या सर्व कामकरी मधमाश्या पोळ्यास उपद्रव देणार्याला दंश करून पोळ्याचे रक्षण करतात. हल्ला करताना पोळ्यातील सर्व कामकरी माश्यांना फेरॅमोन जातीच्या गंध द्रव्याच्या सहाय्याने सूचना दिली जाते. त्यामुळे एकाच वेळी सर्व कामकरी माश्या उपद्रव करणार्यावर हल्ला करतात. कामकरी माशीच्या पोटाच्या शेवटी असलेल्या दोन वक्र काट्यांच्या स्वरूपात असलेला अवयव म्हणजे मधमाशीची नांगी. नांगीच्या तळाशी असलेल्या विषग्रंथीभोवती स्नायू असतात. हल्लेखोराच्या शरीरात नांगी घुसवताना विषग्रंथीमधून विष बाहेर येते. पण दंश केल्यानंतर नांगी हल्लेखोराच्या शरीरातच राहते. नांगी शरीराच्या बाहेर पडल्यामुळे नंतर कामकरी माशीचा मृत्यू होतो.
Esakal