नागरिकांमध्ये येतोय ‘डिस्ट्रेसनेस’
वृद्धांच्या समस्या वाढल्या, महिलांमध्ये मात्र परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता

रिसोड (जि.वाशिम) ः दैनंदिन जीवनात घराबाहेर पडून काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित लॉकडाउनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून घरातच राहिल्यामुळे अनेकांना तणावाच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. यामधुन बाहेर निघण्यासाठी काहींनी मानसोपचारतज्ज्ञांचे सल्ले घेतले आहेत. घरातच राहून विविध गोष्टींमध्ये मन रमविल्यास मानसिक तणावामधून दिलासा मिळू शकेल, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. (Lockdown causes ‘distress’ among citizens)

लहान मुलं, तरुण, वृद्ध किंवा महिला या सर्वांवर या लॉकडाउनचा परिणाम घडून येत असल्याचे चित्र आहे. मुलं शाळेत, माणसं ऑफिस किंवा व्यवसायात, वृद्धमंडळी समवयस्कांसोबत तर, महिला देखील दैनंदिन घरकामात व्यस्त असतात. मात्र, कोरोनाच्या घोषित लॉकडाउनमुळे सर्वजण घरातच कोंडून पडले आहेत. यामुळे अनेकांच्या मानसीक स्थितीत चलबिचल सुरू झाली आहे. यात सर्वाधिक समस्या वृद्धांच्या असून, नागरिकांत कोरोनाची धास्ती कायम आहे. घरात राहून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातून नागरिक त्यांच्या मनात एक विशिष्ट चित्र तयार करत असतात. यामधुन मनाची घालमेल सुरु होते.मनातील होणाऱ्या बदलाला वैद्यकीय भाषेत डिस्ट्रेस असे म्हंटल जाते. यात सर्वाधिक तक्रारी ‘मला तर कोरोना होणार नाही ना?’ ही असते. यावर अनेकजण मानसोपचार तज्ज्ञाचा सल्लाही घेऊ लागले आहेत हे विशेष! यात मुलं, तरुण, वृद्ध आणि महिला अशी वर्गवारी करता येईल. या सर्वांच्या समस्या व अडचणी वेगवेगळ्या आहेत हे पण दिसून येत आहे.

Also Read: पैशांच्या आमिषावर उच्चभ्रू वस्तीत सुरू होता वेश्या व्यवसाय

संग्रहीत छायाचित्र

मुलांचा स्क्रीनटाइम कमी करावा ः बालरोगतज्ज्ञ डॉ.गरकळ
मुलं स्वच्छंदी आयुष्य जगणारे असतात. अशावेळी त्यांना एकाच जागेवर थांबवून ठेवले तर त्याचा विपरित परिणाम घडतो. मुलांच्या शाळा बंद आहेत. त्यांचे रोजचे रुटीन असंतुलित झाले आहे. रात्रीचे जागरण वाढले आहे. सतत टीव्ही आणि मोबाइलवर वेळ घालवला जातोय. मित्रमैत्रिणींशी दुरावा झालाय. सारखे घरी राहून मुलांच्या मेंदूमध्ये एंडोसीन नावाचा हॉर्मोन तयार होतो. त्यामुळे त्यांच्यात चिडचिड आणि तणाव (डिस्ट्रेस) वाढतोय. मुलांसाठी ही स्थिती गंभीर आहे. मोबाईलमुळे मेंदूचा वापर जास्त होतो. त्याने मानसिक थकवा येऊन ते चिडचिड करतात, रडतात प्रसंगी आक्रमकही होतात. त्यांच्या जेवणावरही परिणाम होतो. मैदानी खेळ खेळल्यास हा प्रश्न येत नाही. यासाठी मुलांचा स्क्रीनटाइम (मोबाईल, टीव्ही) कमी करून इनडोअर गेम्स शिकवावे. सूर्यनमस्कार, व्यायाम शिकवावा. कलाकुसर किंवा बौद्धिक क्षमतावाढीचे खेळ शिकवावे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ डाॅ.विजय गरकळ यांनी दिला आहे.

Also Read: १०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?

महिलांची समायोजन क्षमता मोठी ः डाॅ.अशिष सिंह
कोरोनामुळे महिलांमध्ये चिंता, अनिश्चितता आणि अनिवार्यता अशा तीन समस्या आढळून येत आहेत. मात्र, याचे प्रमाण क्वचितच आहे. महिलांना या गोष्टींकडे पाहण्याची उसंतच मिळत नाही. लॉकडाउनमुळे काम करणारी बाई येत नसल्याने सर्व कामे तिलाच करावी लागत आहेत. यातच तिचा दिवस संपतो. अतिरिक्त विचार करायला तिला वेळच मिळत नाही. महिला कुटुंबासोबतच जास्त रमत असल्याने हा वेळ ती जास्तीत जास्त परिवारासोबत घालवत आहे. एकीकडे जगातील महिला त्रासलेल्या आहेत तिथेच आपल्याकडील महिला पापड, कुरड्या करत आहेत, ही समाधानाची बाब म्हणता येईल. त्यांचे परिस्थितीशी समायोजन (कोपिंग) खूप चांगले आहे. परिस्थितीनुरूप पर्यायी आणि पोषक नियोजन करणे महिलांचे वैशिष्ट्यगूण आहेत. त्या जन्मतःच आशावादी असतात. त्यामुळे या प्रसंगाकडेही त्या आशेने बघत असल्याचे मत रिसोड वैद्यकिय अधिकारी डाॅ.अशिष सिंह यांनी व्यक्त केले.

संपादन – विवेक मेतकर

Lockdown causes ‘distress’ among citizens

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here