आजूबाजूच्या वातावरणातील वास्तवामध्ये आभासी वस्तू अध्यारोपीत करून एकमेकांवर क्रिया करणारा अनुभव निर्माण करणे आणि त्यातून वस्तूंचे वर्धित प्रस्तितुकरण करणे या तंत्रज्ञानाला वर्धित वास्तव असे म्हणून ओळखले जाते. यात तीन महत्वाच्या गोष्टींचा समावेश होतो वास्तविक आणि आभासी जगाचे एकीकरण, प्रत्यक्ष संवाद आणि अचूक त्रिमितीय प्रतिकृती तयार करणे. तर संगणकीय तंत्रज्ञाचा वापर करून संपूर्णपणे आभासी जगाची निर्मिती करणे याला आभासी वास्तव असे संबोधले जाते. याचा महत्वाचा भाग म्हणजे शिर आरोहित प्रदर्शन पडदा, (Head Mounted Display Device ) ज्यातून वापरकर्त्याला आभासी वास्तवात विसर्जित केले जाते आणि तो त्रिमितीय जगाशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा अनुभव घेऊ शकतो. वास्तविक आणि आभासी जगाचे विलीनीकरण करून नवीन वातावरण निर्माण करणे हे मिश्रित वास्तव होय. यात आभासी वस्तू आणि भौतिक वस्तू ह्यांचे सहअस्तित्व असते.

मॉर्टिन हेलिग यांना आभासी वास्तवाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यांनी १९६० मध्ये ‘टेलिस्पेअर मास्क’ या उपकरणांसाठी स्वामित्व हक्क मिळविला. आभासी वास्तवासाठी सगळ्यात महत्वाचा आहे तो शीर आरोहित प्रदर्शन पडदा. यात विशिष्टता, गुणवत्ता, कामगिरी आणि किंमत यावर आधारित भरपूर विकल्प उपलब्ध आहेत. भ्रमणध्वनी आधारित गुगल कार्डबोर्ड, संगणक आधारित एचटीसी व्हाईव, ओकुलस क्वेस्ट-२ आणि प्लेस्टेशन हे विशिष्ट्य उपकरणे आहेत.

Medical Treatment

शीर आरोहित उपकरणांमध्ये द्रव स्फटिक प्रकारचे दोन डोळ्यांसाठी दोन पडदे असतात. पडदा आणि डोळे यामध्ये भिंग बसविलेले असते ज्याचा उपयोग चित्राचा आकार बदलून प्रत्येक डोळ्यांसाठी केंद्रित करण्यासाठी होतो. ह्यातून द्विमितीय चित्रांचा उपयोग करून त्रिमितिदर्शी प्रतिमा तयार केल्या जातात. शीर आरोहित उपकरणांमध्ये द्रव स्फटिक प्रकारचे दोन डोळ्यांसाठी दोन पडदे असतात. पडदा आणि डोळे यामध्ये भिंग बसविलेले असते ज्याचा उपयोग चित्राचा आकार बदलून प्रत्येक डोळ्यांसाठी केंद्रित करण्यासाठी होतो. ह्यातून द्विमितीय चित्रांचा उपयोग करून त्रिमितिदर्शी प्रतिमा तयार केल्या जातात. शीर आरोहित उपकरणांमध्ये कमीत कमी ६० चित्रचौकटी प्रति सेकंद असा दर गरजेचं आहे, आज बाजारात असलेल्या काही उपकरणांमध्ये ९० आणि १२० चित्रचौकटी प्रति सेकंद अशी क्षमता आहे. आभासी वास्तविकतेत त्रिमितीय आवाजाचा उपयोग केला जातो ज्यातून श्रुतयोजन साधून वापरकर्त्याला मागून, पुढून आणि दोन्ही बाजूने आवाज आल्याचा अनुभव दिला जातो. या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रापासून सुरु होऊन तो आता वैद्यकीय क्षेत्राच्या विविध अंगामध्ये होत आहे. सुईने टोचून अंगात औषध सोडताना बहुतेकवेळी परिचारिकाना नेमकी नस सापडत नाही, विशेषतः लहान मुले आणि वयस्कर रुग्ण याबाबत ही अडचण येते. अक्यूव्हेन ही कंपनी वर्धित वास्तवाद्वारे प्रतिमा प्रदर्शक यंत्राचा वापर करून शरीरातील रुग्णाच्या नसा प्रदर्शित करतात जेणेकरून नसेमध्ये सुई टोचणे सोपे होते. मानवी शरीराच्या आत डोकाऊन पाहण्याची क्षमता आभासी वास्तव देते, रुग्णाला त्याच्या शरीरातील व्याधीची परिपूर्ण माहिती देऊन शस्त्रक्रियेसंबंधी त्याचे समुपदेशन केल्याने रुग्णाचा चिकित्सकावरील विश्वास वाढून उपचार करणे सुलभ होते.

स्टॅंडफोर्ड विद्यापिठामधील वैद्यकशास्त्र विभागात मेंदू शस्त्रक्रिया विभागात आभासी वास्तव माध्यमाद्वारे विद्यार्थाना मेंदूच्या त्रिमितीय आभासी प्रतिकृतीतून प्रशिक्षण देण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी मेंदूच्या विकारांची वेगवेगळी प्रकरणे आणि मेंदूची किचकट रचना ह्याचा अभ्यास करू शकतात. विशेष म्हणजे ह्या त्रिमितीय आभासी प्रतिकृती द्विमितीय प्रतिमांपासून बनविण्यात आलेल्या आहेत. ह्यातून शस्त्रक्रियांची योजना आणि त्याबद्दलचा दृष्टिकोन ह्यात अमाप बदल झाल्याचे चिकित्सक मान्य करतात. ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल विद्यापीठात दंतचिकित्सा शाखेचे विद्यार्थी आभासी वास्तव माध्यमाद्वारे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना भुलीसाठी दिल्या जाणाऱ्या औषधाच्या प्रमाणाचे आणि त्याच्या रुग्णाच्या शरीरावरील परिणामाचा अभ्यास ह्याचे प्रशिक्षण घेत आहेत.

दूरस्थ रुग्ण देखरेख आणि सेवा ह्यात रुग्णाचे महत्वाचे मापदंड जसे कि रक्तदाब, हृदयाच्या ठोके, रक्तातील साखरेचे प्रमाण, शरीराचे तापमान आणि शारीरिक हालचाल यांचे मोजमाप आणि विश्लेषण याचा समावेश होतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाची सहजपणे देखरेख आणि उपचार करणे सोपे झाले आहे, विशेषतः अतिदुर्गम भागातील रुग्णांना जिथे विशेषज्ञ वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत ह्याचा फायदा होत आहे. आभासी वास्तव आणि वर्धित वास्तव या तंत्रज्ञानाच्या वैद्यकीय क्षेत्रातील वाढता व्यवसाय २०२५ पर्यंत १०.८२ बिलियन डॉलर पर्यंत वाढण्याची शकयता आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. आता गरज आहे ती वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाला या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचे. ह्यातून वैद्यकीय क्षेत्रातील वर्धित वास्तव/ आभासी वास्तव /मिश्रित वास्तव ह्यांच्या उपयोजनाचा परीघ नक्कीच विस्तारेल.

वर्धित वास्तव/ आभासी वास्तव /मिश्रित वास्तव या तंत्रज्ञानांचा उपगोय आता अभियांत्रिकी शिवाय वैद्यकीय क्षेत्रामध्येही यशस्वीपणे होत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, रुग्णांचे समुपदेशन, शस्त्रक्रियांची योजना, औषधांचा रुग्णाच्या शरीरावरील परिणामांचा अभ्यास करणे, दूरस्थ रुग्ण देखरेख आणि सेवा याचा समावेश होतो. अभियंते आणि वैद्यकीय तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे या क्षेत्रात संशोधन करण्याची गरज आहे, ज्यातून अनुप्रयोगांचा परीघ वाढवता येईल. दुसरीकडे वैद्यकीय विद्यार्थी मात्र या सगळ्यांपासून अजून अनभिज्ञ आहेत, गरज आहे ती आता त्रिमितीय तंत्रज्ञान आणि वर्धित वास्तव/ आभासी वास्तव यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची. जेणे करून वैद्यकीय तज्ज्ञांची पुढची पिढी ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्यास सज्ज आणि सक्षम होईल.

(लेखक डॉ. विश्वनाथ कराड एम.आय.टी. विश्वशांती विद्यापीठ, पुणे येथे यंत्र अभियांत्रिकीचे प्राध्यापक असून या विषयाचे अभ्यासक आहेत. )

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here