स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावर अनेक शिवकालीन वस्तू सापडल्या असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी दिली.
वेल्हे,(पुणे)- स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडावर अनेक शिवकालीन वस्तू सापडल्या असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे यांनी दिली. छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी किल्ले राजगड. पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ स्वराज्याचा राज्यकारभार ज्या राजगडावरुन चालविला त्या राजगडावर साडेतीनशे वर्षानंतरही अनेक इतिहासाच्या साक्ष देणा-या शिवकालीन वस्तू अनेक वर्षापासून सापडत आहेत. (history Shivaji maharaj period things found on Rajgad velhe)

दुर्गप्रेमी सह्याद्री प्रतिष्ठानच्या ग्रुपला पुरातत्व विभागाच्या परवानगी नंतर किल्ले राजगडावर स्वच्छता करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या ,संजीवनी माचीवरील मातीने अर्धवट गाडलेले दरवाज्या जवळील माती काढताना अनेक शिवकालीन वस्तू सापडल्या. यामध्ये दोन तोफगोळे, एक पाते तुटलेली तलवार, जुनी आठ ब्रिटीश कालीन नाणी, दगडी अवशेष, लाकडी फळ्या तर अलीकडच्या काळातील देवीचा टाक अशा वस्तू या स्वच्छता अभियानातंर्गत मिळाल्या.

वस्तू पुरातत्व विभागाच्या स्वाधिन केल्या असल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे राज्य सचिव गणेश खुटवड यांनी दिली असून यास पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे दुजोरा दिला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान ग्रुप च्या माध्यमातून किल्ले राजगडावर गेली अनेक दिवसांपासून स्वच्छता अभियान, प्रवेशद्वार मोकळे करणे, पावसाळ्यात वाटा बंद होऊ नये म्हणून मार्ग स्वच्छता करणे यासाठी काम केले जाते, असं सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य सचिव गणेश खुटवड म्हणाले.

किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचे उत्खनन करण्याची परवानगी दिली जात नसून स्वच्छता मोहिमेसाठी परवानगी दिली जाते, असं सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग विलास वाहणे म्हणाले.
Esakal