ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे एप्रिलमध्ये कोरोनाने निधन झाले. किशोर यांनी आतापर्यंत सुमारे ४० नाटकं, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमध्ये काम केलं. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मराठी अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले. अभिलाषा यांनी दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर अनेक भूमिका गाजवल्या आहेत. ‘बायको देता का बायको’, ‘प्रवास’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. तर सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूरच्या ‘छिछोरे’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली होती. मराठी टेलिव्हिजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे १९ मे रोजी कोरोनाने निधन झाले. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत ते भावेंची भूमिका साकारत होते. जवळपास दोन दशकं त्यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रांत काम केलं. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता नवनाथ गायकवाड याचे मे महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या दक्षिण नागपुरातील जोगीनगर वस्तीतील क्रांतीकारी लोकशाहीर, गीतकार आणि तळागाळातील वंचितांच्या हक्कासाठी लढा उभारणारा कार्यकर्ता तसेच ऑस्करसाठी निवड झालेल्या ‘कोर्ट’ सिनेमाचे नायक वीरा साथीदार (विजय वैरागडे) यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. आठ दिवसांच्या झुंजीनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. देऊळबंद, मुळशी पॅटर्न या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता अमोल धावडेचं कोरोनाने निधन झालं. अमोलच्या निधनानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी भावनिक पोस्ट लिहिली होती. ‘निर्व्यसनी, रोज व्यायाम करणारा, धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसांत कोरोनाने खाल्ला’, असं लिहित तरडेंनी त्याच्या काही आठवणी सांगितल्या होत्या. मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाने निधन झालं. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती.