भारतीय आयुर्वेदात अभ्यंग स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच अनेक शारीरिक व्याधी वा आजारपणामध्ये वैद्य रुग्णावर वेगवेगळ्या तेलाच्या माध्यमातून उपचार करत असतात. विशेष म्हणजे अभ्यंग स्नानासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलामुळे शरीरासोबतच मानसिक शांततादेखील मिळते. त्यामुळे जवळपास ६ हजार वर्षांपासून आपल्याकडे आयुर्वेदात काही तेलांचा वापर केला जातो. ही तेलं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असून त्यामुळे तन-मन आणि त्वचा निरोगी राहते. याविषयी प्रसिद्ध अरोमाथेरपिस्ट डॉ. ब्लॉसम कोचर यांनी काही महत्त्वाच्या तेलांविषयी माहिती दिली आहे. जॅस्मिन ऑइल-
त्वचेची गुणवत्ता व पोत चांगली राखण्यासाठी जॅस्मिन ऑइलचा वापर केला जातो. सोबतच या तेलाच्या सुवासामुळे मन:शांतीदेखील मिळते. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये या तेलाचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी दोन चमचे बदामाचं तेल व २ चमचे जॅस्मिन ऑइल मिक्स करावं व या तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करावी. बहुउपयोगी व बहुगुणी म्हणून चंदनाकडे पाहिलं जातं. चंदन थंड असल्यामुळे उष्णप्रवृत्तीच्या लोकांनी आवर्जुन चंदनाचा वापर करावा. चंदनामध्ये अँटी इंफ्लेमेटरी, अँटी मायक्रोबिअल आणि अँटी प्रोलिव्हरेटिव्ह गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचाविकार दूर होतात. घरच्या घरी चंदनाचा लेप तयार करुन तो पॅकदेखील चेहऱ्याला लावता येऊ शकतो. यासाठी १ चमचा ओट, १ चमचा साय, १ चमचा बारीक बदामाची पूड, २ चमचे चंदनाचं तेल मिक्स करा व हा पॅक चेहऱ्याला लावा. पॅक लावत असतांना हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करा व पॅक वाळल्यानंतर गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. गुलाबाचं फूल हे थंड गुणधर्माचं आहे. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जुन गुलाबजल, गुलाबाचं सरबत, गुलकंद असे गुलाबापासून तयार केलेल पदार्थ वा वस्तू प्रत्येक जण वापरत असतो. त्याचप्रमाणेच गुलाबाच्या तेलाचेदेखील अनेक फायदे आहेत. गुलाबाचं तेल हे उत्तम टोनर आहे. त्यामुळे त्वचेतील आद्रर्ता टिकून राहते. एका बाटलीत पाणी घेऊन त्यात ३-४ चमचे गुलाबाचं तेल टाका व चेहऱ्यावर स्प्रेच्या सहाय्याने शिंपडा. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे अशा व्यक्तींनी या तेलाचा वापर करावा. लव्हेंडर ऑइल, केशर तेल, कॅमोमाईल तेल एकत्र करुन हे तेल तयार केलं जातं. लव्हेंडर ऑइलमुळे त्वचेची जळजळ कमी होते. तर कॅमोमाईल व केशर तेलामुळे त्वचेला थंडावा मिळतो. हे तेल दररोज सकाळी व रात्री चेहरा व गळ्याभोवती लावावं. त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी व त्वचेला थंडावा देण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांना या तेलाने मालिश करण्याचा सल्ला दिला जातो.