पुणे – शहरातील ४४.४ किलोमीटर अंतरातील नदीकाठाचे (Riverine) रूप पालटून टाकणारा प्रकल्प (Project) राबविण्याआधी जगभरातील (Worlds) विविध शहरांतील नदीकाठांचा अभ्यास (Study) करण्यात आला आहे. त्यातूनच हे काम करताना येणाऱ्या अडचणी व पर्यावरणाला (Environment) आणि नदीच्या पात्राला धक्का न लावता कामे कशी करावयाची, याचे पर्याय उलगडत गेले आहेत. नदी पुनरुज्जीवनाच्या बृहत् आराखड्यात या सगळ्याचे प्रतिबिंब दिसते. (study of the worlds cities for riverine development in the city of Pune)

Worlds River Project

पूरनियंत्रण, नैसर्गिक स्थितीचा वापर, नदीकाठांचे सुशोभीकरण, दाट वस्तीच्या ठिकाणची कामे या सगळ्यांसाठी सात देशांमधील दहा नदीकाठांचा अभ्यास केला आहे. शहरातील नदीकाठांच्या पुनर्रचनेचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवर काम करणाऱ्या अहमदाबादस्थित ‘एचसीपी डिझाईन’ या कंपनीतर्फे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या बृहत् आराखड्याचे काम केले आहे.

Also Read: पुणेकरांना दिलासा! आज सोमवारी आढळले पाचशेपेक्षाही कमी रुग्ण

या आराखड्यानुसार नदीकाठांच्या जवळ वस्ती असलेल्या भागात पूरनियंत्रण आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीने नैसर्गिक चढाचा फायदा घेत सुशोभीकरणाची रचना करण्यात येणार आहे. यासाठी डेन्मार्कमधील कोपनहेगन शहरातील ओरेसंड सामुद्रधुनीसह बीजिंग शहरातील लुआन नदीकाठाचा अभ्यास केला आहे.

नदीशेजारी मध्यम वस्ती असलेल्या भागांतील नदीकाठांची खालचा टप्पा आणि वरचा टप्पा अशा द्विस्तरीय पद्धतीने सुशोभीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. नदीकाठावरील नागरी सुविधांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या जपानमधील क्योटो येथील कॅमो नदीकाठाचा या प्रकारच्या रचनेसाठी विशेष अभ्यास केला आहे. यासह अमेरिकेतील कॅन्सास सिटीतून वाहणाऱ्या ब्लू नदीची उपनदी असलेल्या ब्रश खाडीचे काठही विचारात घेण्यात आले आहेत.

शहरातील काही भागांत नदीकाठी दाट वस्ती असून, नदीपात्र आणि इमारती यांत बेताचे अंतर आहे, अशा ठिकाणी नदीकाठांची नैसर्गिक पद्धतीने पुनर्रचना करणे अशक्य होते. त्यामुळे पूरनियंत्रणाच्या हेतूने केवळ सीमाभिंत उभारण्याशिवाय पर्याय उरत नाही. तथापि, या सीमाभिंतीदेखील नदीकाठांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असतील, अशी रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी इटलीतील रोम येथील टायबर नदीकाठ, अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील स्कूलकिल नदीकाठ व स्पेनमधील बिल्बाओ शहरातून वाहणाऱ्या नेर्व्हियन नदीच्या काठांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.

Also Read: म्युकरमायकोसिस रुग्णांचा शोध घरोघरी जाऊन घेणार झेडपी

आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार नदीच्या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक परिस्थिती व गरजेनुसार प्रवेश मार्ग, पादचारी मार्ग, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, आसनव्यवस्था, उद्यान, नौकाविहार, घाट, विसर्जन घाट, विसर्जन हौद, चौपाटी, मनोरंजन व्यवस्था इत्यादी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पर्यावरणाला धक्का न लागता या सुविधा कशा निर्माण केल्या जातात, यासाठी फिलाडेल्फियातून वाहणाऱ्या डेलावेअर नदीकाठच्या रेस स्ट्रीट पिअर या खास विकसित केलेल्या परिसराचा अभ्यास केला आहे. पॅरिसमधील सेन नदीकाठी केवळ उन्हाळ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पॅरिस प्लेजेस’ या उत्सवाचाही अभ्यास केला आहे.

मुळा-मुठा नदीकाठ जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा आधार घेत आदर्श पद्धतीने विकसित होणार आहे. जगभरातील अनेक नदीकाठांचा झालेला विकास त्यासाठी डोळ्यांसमोर ठेवला आहे. नदीच्या पुनरुज्जीवनासह नागरी जीवनही वृद्धिंगत करणारा हा प्रकल्प आहे.

– गणेश बिडकर, सभागृह नेता

पुण्याचा नदीकाठ विकास जागतिक निकषांवर

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत नदीकाठ विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे. नदीचे दोन्ही काठ मिळून तब्बल ८८.८ किलोमीटर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी विविध देशांतील नदीकाठांचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे.

वारसास्थळांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न

मुळा-मुठा नदीशेजारी असलेल्या अनेक ऐतिहासिक वारसास्थळांना नदीच्या सुशोभीकरणात सामावून घेण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. यात शहरातील ब्रिटिशकालीन पुलांचाही समावेश आहे. यासाठी अमेरिकेतील मिनियापोलिस शहरातील मिसिसिपी नदीवर १८८३ साली बांधलेल्या ऐतिहासिक दगडी कमानी पुलाचा (स्टोन आर्च ब्रिज) अभ्यास केला आहे. यासह आयफेल टॉवर, लुव्र म्युझियम यासारख्या स्थळांच्या अगदी शेजारून जाणाऱ्या पॅरिसमधील सेन नदीचाही नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत अभ्यास करण्यात आला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here