कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता देशात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. अशात लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी देखील वाढू लागली आहे. लसीकरण केंद्रावरील गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पुण्यात राष्ट्रीय छात्र सनेच्या (एनसीसी) कॅडेट्सने पुढाकार घेतला आहे. सध्या पुणे एनसीसी मुख्यालयातील 200 कॅडेट्स पिंपरी चिंचवड येथील 11 लसीकरण केंद्रावर गर्दी नियंत्रांसाठी मदत करत आहेत. एप्रिल पासून हे कार्य सुरू असून या सर्व कॅडेट्सचे लसीकरण झाले आहे. एनसीसी कॅडेट्सच्या पालकांकडून परवानगी घेण्यात आली आहे. दररोज या कॅडेट्सला घेऊन जाणे व परत एनसीसी मुख्यालयात सोडण्यासाठी पीएमपीएल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कठीण परिस्थितीमध्ये देशसेवेची जबाबदारी पार पडण्याची ही उत्तम संधी एनसीसी कॅडेट्सला मिळाली आहे. यामुळे भविष्यात विविध परिस्थितींशी सामना करताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. असे कर्नल विनायक चव्हाण यांनी सांगितले.एनसीसी आर्मी विंग कॅडेट लकी जोशी म्हणाला, “मी बाबुरावजी घोलप कॉलेजमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या दुसऱ्या वर्षात आहे. प्रत्येक केंद्रासाठी 10 कॅडेट्सचे गट तयार करण्यात आले आहे. तसेच सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत केंद्रावर आम्ही गर्दी होणार नाही याची काळजी घेतो. पिंपरी चिंचवड प्रमाणे आता पुणे महापालिकेच्या वतीने देखील केंद्रावरील गर्दी नियंत्रणासाठी एनसीसी कॅडेट्सला तैनात करण्यासाठी एनसीसी मुख्यालयाला पत्र पाठवले आहे. त्यानुसार जून पासून हे कॅडेट्स आता शहरातील लसीकरण केंद्रांवर मदत कार्य सुरू करतील. अशी माहिती पुणे एनसीसी मुख्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.शिस्त ही लष्कराची प्रमुख ओळख असते. एनसीसी मध्ये शिस्त, अनुशासनाचे धडे मुलांना दिले जाते. नागरी प्रशासनाच्या विनंतीस मान्यता देण्यापूर्वी आम्हाला एनसीसी संचालनालयाकडून परवानगी घ्यावी लागेल व त्यानुसार कॅडेट्सला लसीकरण केंद्रांवर नेमले जाईल अशी माहिती पुणे एनसीसी ग्रुप कमांडर, ब्रिगेडियर सुनील लिमये यांनी दिली.