ऑलिंपिकमध्ये पुरुषांचं आणि महिलांचं प्रमाण समान कसं राहील यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती कसोशीनं प्रयत्न करत आहे, त्यामुळे मिश्र स्पर्धा वाढत आहेत. एवढंच नव्हे तर, हॉकीसारख्या खेळातही मिश्र स्पर्धा कशा होतील याचे प्रयोग होत आहेत. मात्र, भारतीय क्रिकेटमध्ये असे कोणतेही नियम नसतात हेच पुन्हा दाखवून देण्यात आलं आहे.

भारतीय महिला क्रिकेटपटूंचं वार्षिक मानधन जाहीर झालं असून भारतीय क्रिकेट मंडळ त्यांना किती कमी लेखतं हे त्यावरूनच लक्षात येतं. पुरुष क्रिकेटपटूंच्या ‘क’ श्रेणीतील खेळाडूच्या निम्मी रक्कम त्यांनी महिला क्रिकेटपटूंमधील ‘अ’ श्रेणीतील खेळाडूला देऊ केली. जेव्हा एकाच देशाच्या एकाच खेळातील कर्णधारांच्या मानधनात पुरुषाला सात कोटी आणि महिला खेळाडूला ५० लाख मिळतात तिथं वेगळं काय घडणार!

या निर्णयावर टीका सुरू झाल्यावर भारतीय मंडळाची तळी उचलण्यात आघाडीवर असलेल्यांनी, महिला क्रिकेटमधून काय उत्पन्न मिळतं…त्यांचे किती सामने होतात…त्यांना किती प्रेक्षक लाभतात असे प्रश्न विचारले आहेत.

दुसरीकडे, महिला क्रिकेटमधील सामने कसे दिसणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या महामारीच्या कालावधीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया भारतीय महिला संघाला निमंत्रण देत असताना भारतीय मंडळ त्यांना पाठवण्यास तयार नव्हतं. इंग्लंडचा पुरुष संघ विंडीजविरुद्धची मालिका जैवसुरक्षित वातावरणात खेळला, त्या वेळी भारत-इंग्लंड महिला क्रिकेट मालिकेसाठी तयारी चालली होती. आता भारतीय महिला संघ प्रकाशझोतातील पहिली कसोटी खेळणार, त्या वेळी आयपीएलची धूम असणार, त्यामुळे त्याकडे किती लक्ष देण्यात येईल? भारतीय मंडळानं पुरुष क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलियादौऱ्याचा कार्यक्रम तयार करताना संघाचा पुरेसा सराव कसा होईल, कशी विश्रांती मिळेल याचा विचार केला होता. हे महिलांबाबत कुठंच दिसत नाही. तिसरी एकदिवसीय लढत २४ सप्टेंबरला होणार, तर प्रकाशझोतातील कसोटी ३० सप्टेंबरपासून होणार, यात सराव सामना कुठं आहे?

कोरोनाच्या महामारीमुळे क्रिकेट बंद पडण्यापूर्वी भारतीय महिला संघानं विश्वकरंडक ट्वेंटी-२० स्पर्धेचं उपविजेतेपद जिंकलं होतं. भारतीय महिला क्रिकेटपटू अजूनही या बक्षीसरकमेच्या प्रतीक्षेत आहेत. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया खेळाडूंना बक्षीसरक्कम मिळाली नाही. तर पुरुष संघाला मात्र जेवढी रक्कम मिळाली तेवढी देण्यात आली. त्यासाठी अतिरिक्त रक्कम ‘क्रिकेट-ऑस्ट्रेलिया’नं दिली, हा अपवाद नव्हता. २०१६ मधील विश्वकरंडक महिला ट्वेंटी-२० स्पर्धेच्या वेळी आयसीसीनं ‘एका रूममध्ये दोन खेळाडू राहतील,’

तसंच ‘इकॉनॉमी श्रेणीतून विमानप्रवास करतील,’ असं सांगितलं होतं. ‘क्रिकेट-ऑस्ट्रेलिया’नं ‘आमच्या खेळाडू स्वतंत्र रूममध्ये राहतील आणि बिझनेस क्लासनं प्रवास करतील, आम्ही दोहोंतील फरक देतो,’ असं सांगितलं. ‘क्रिकेट-ऑस्ट्रेलिया’नं २०१७ पासून ऑस्ट्रेलियाचा पुरुष क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ यांत समानता आणली. भारतीय क्रिकेटमध्ये नजीकच्या कालावधीत तरी हे घडण्याची शक्यता नाही.

जागतिक स्तरावर

२०१७ मध्ये ‘बीबीसी स्पोर्ट’नं केलेल्या ६८ खेळांच्या सर्वेक्षणात ८३ टक्के स्पर्धांत पुरुष आणि महिलांसाठी समान बक्षीसरक्कम असते.

  • महिला क्रिकेटपटूंच्या देशांतर्गत मानधनातून साहित्याचा खर्चही निघत नाही.

  • २३ वर्षांवरील महिला खेळाडू सर्व स्पर्धांतील सर्व सामन्यांत खेळली तरी तिचं वार्षिक मानधन होतं दोन लाख ७५ हजार.

  • अनेक महिला क्रिकेटपटू रेल्वेतील नोकरीवर प्रामुख्यानं अवलंबून.

  • महिला क्रिकेटपटूंना स्पर्धेच्या कालावधीत खास भत्ता मिळतो; पण सामन्याच्या वेळीही त्या जास्त खात नाहीत, वाचलेले पैसे कुटुंबासाठी होतील हा त्यामागं विचार.

  • माध्यमहक्कातून पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना मिळतात १३ टक्के, तर महिला आणि कुमार खेळाडूंना २.७ टक्के.

(सर्व आकडेवारी भारतीय महिला क्रिकेटबाबत स्नेहल प्रधान, करुण्या केशव, सिद्धान्ता पटनायक यांनी तयार केलेल्या ‘ॲन इक्वल व्ह्यू’ या अहवालातून)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here