”सकाळ सोशल फाउंडेशन” च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ”सोशल फॉर अॅक्शन” हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.त्यातूनच स्वयंसेवी संस्था व देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते.आजच्या भागात अनाथ मुलांसाठी व मानसिक विकलांग महिलांसाठी आधार ठरलेल्या ”माहेर” या संस्थेची माहिती….

‘माहेर’ म्हणजे ‘आईचं घर’, आशेचं स्थान, आपलेपणानं व समजून घेणारं हक्काचं ठिकाण. माहेर संस्थेकडून लिंग, जात, पंथ किंवा धर्म कोणताही असो; महाराष्ट्राबरोबर भारतातील ग्रामीण, शहरी व झोपडपट्टी भागातील हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला, मुलं, त्याचबरोबर अनाथ मुलं – मुली व मानसिक विकलांग महिला यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून, मानसिक आधार देण्याबरोबरच शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी व त्यांना समाजात अभिमानानं जीवन जगता यावं यासाठी प्रयत्न केले जातात.

‘माहेर’ संस्थेची स्थापना ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन यांनी केली आहे. होली क्रॉस कॉन्व्हेंटनं स्थापन केलेल्या आणि अत्याचाराला व हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना मदत करणाऱ्या होप फाउंडेशन संस्थेमध्ये काम करण्यासाठी सिस्टर लुसी कुरियन १९८८ मध्ये समाजसेविका म्हणून मुंबई येथे रुजू झाल्या होत्या. १९९१ मध्ये एके दिवशी संध्याकाळी एक गर्भवती महिला सिस्टर लुसी कुरियन यांच्याकडे मदतीसाठी आली. त्या गर्भवती महिलेला अशी भीती होती, की तिचा नवरा दुसर्‍या महिलेला तिच्या घरात आणण्यासाठी तिला ठार मारणार आहे. त्यामुळं त्या महिलेनं सिस्टर लुसी कुरियन यांना रात्र घालवण्यासाठी आश्रय मागितला. परंतु सिस्टर लुसी यांनी त्या महिलेस घाबरून न जाता स्वतःच्या घरी जाण्यास सांगितलं व दुसर्‍या दिवशी तिच्या पतीची समजूत काढू, असं आश्वासन दिलं.

सिस्टर लुसी कुरियन एका सुरक्षित कौटुंबिक वातावरणात वाढल्या असल्या कारणानं त्यांना माहीत नव्हतं, की एका रात्रीनं त्या गर्भवती स्त्रीच्या आयुष्यात असा काही फरक पडेल. त्या रात्री, त्या महिलेच्या नवऱ्यानं दारूच्या नशेत, तिला पेटवून दिलं. सिस्टर लुसी यांनी जळालेली स्त्री पाहिली आणि तिच्या वेदना व किंचाळ्या ऐकल्या. सर्वांनी आग विझवली आणि तिला दवाखान्यात नेलं, पण तिचं ९० टक्के शरीर भाजलं होतं. जळाल्यामुळे तिचं निधन झालं, तिच्याबरोबर तिच्या पोटात असणाऱ्या सात महिन्यांच्या गर्भाचादेखील मृत्यू झाला.

QR Code

या घटनेनं सिस्टर लुसी खूप खचल्या. त्या महिलेला आपण वाचवू शकलो नाही, या गोष्टीची त्यांना खंत होती. या क्रूर जगापासून दूर जाण्याचा विचार त्यांच्या मनात आला; पण त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं आणि अशा महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी कार्य करण्याचा सल्ला दिला. त्यातील एक सहकारी हे फादर फ्रान्सिस डिसोझा होते. त्यानंतर सिस्टर लुसी यांनी ठरवलं की, अत्याचार झालेल्या आणि आघात झालेल्या स्त्रियांसाठी एक हक्काचं घर तयार करायचं, जिथं त्यांना सुरक्षित वाटेल. आणि त्यातून ‘माहेर’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली. या सर्व प्रक्रियेत फादर फ्रान्सिस डिसोझा यांनी ‘माहेर’ला आर्थिक पाठबळ मिळवून दिलं, तसंच परदेशांतील बर्‍याच मित्रांना ‘माहेर’ संस्थेला मदत करण्यास सांगितलं.

संस्थेला पूर्ण क्षमतेनं मदत मिळण्यासाठी बराच कालावधी लागला; पण १९९७ मध्ये पुण्याच्या हद्दीतील वढू बुद्रुक या छोट्या गावात ‘माहेर’ संस्थेचं पहिलं घर तयार झालं. आज हेच घर संकटात असलेल्यांसाठी मुख्य आश्रयस्थान झालं आहे. ‘माहेर’ ही संस्था गरजू महिलांसाठी निवारा म्हणून उदयास आली; परंतु वंचित, अनाथ मुलं आणि समाजानं नाकारलेल्या मानसिक विकलांग महिला यांची संख्यासुद्धा समाजात मोठी होती. वंचित, अनाथ व मानसिक विकलांग महिलांना हक्काचं घर व निवारा मिळवून देण्यासाठी सिस्टर लुसी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत ‘माहेर’ संस्थेचा विस्तार करण्यासाठी पुण्याबरोबरच महाराष्ट्रात सातारा, सांगली, रत्नागिरी व राज्याबाहेर केरळ, झारखंड, कोलकता, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ‘माहेर’संस्थेच्या उपशाखा काढल्या व केंद्रांची संख्या वाढविली.

संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महिलांसाठी जागरूकता कार्यक्रमांपासून बचत गट व्यवस्थापन व मुलांसाठी बालवाडी, शिकवण्या, कार्यशाळा असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘माहेर’ संस्था घरगुती हिंसाचारामुळं बळी पडलेल्यांना मदत करण्याबरोबरच गरीब व अशिक्षितांना स्वावलंबी होण्यासाठी विविध प्रकारचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमही राबविते. पुणे जिल्ह्यात ‘माहेर’ संस्थेचे सहा आश्रम असून, एकूण सातशे पन्नास अनाथ मुलं- मुली व तीनशे मानसिक विकलांग महिला आश्रयास आहेत. सर्व मुलांच्या शिक्षणाची सोय त्या-त्या परिसरातील शाळांमध्ये संस्थेकडून केली जाते. तसंच संस्थेकडून सर्व अनाथ मुलांची शालेय शिक्षणापासून ते स्वतःच्या पायावर उभं राहण्यापर्यंतची जबाबदारी घेतली जाते. संस्थेत मुलांना शिक्षणाबरोबरच नृत्य, खेळ, गायन-वादन, चित्रकला यांचंही शिक्षण दिलं जातं, तसंच व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कोर्सेससुद्धा चालविले जातात. संस्थेकडून आतापर्यंत दीडशेहून अधिक मुलींची लग्नं करून दिली आहेत. माहेर संस्थेत ४० मुलांचं एक घर असतं आणि या चाळीस मुलांचं शैक्षिणक शुल्क, शैक्षणिक साहित्य, कपडे व इतर साहित्य, आरोग्य आणि अन्नधान्य यावरील वार्षिक खर्च किमान दहा लाख रुपये आहे. पुण्यातील चाकण परिसरातील न्यूमन अँड ईस्सार इंजिनिअरिंग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘माहेर’ संस्थेला ४० मुलांच्या एका घरासाठी दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे. ‘माहेर’ संस्थेत अशा ४० मुलांची अनेक शाखानिहाय ५३ घरं आहेत.

‘माहेर’ संस्थेच्या वात्सल्यधाम प्रकल्पामध्ये मानसिक विकलांग १०५ महिला आहेत. आशियातील कुमारी मातांसाठी उभारण्यात आलेल्या आधारगृह प्रकल्पात ५८७ महिला आहेत. किशोरधाम प्रकल्पात ८६४ मुलं-मुली आहेत. संस्थेच्या ममताधाम या प्रकल्पाचा ४२११ निराधार महिलांनी लाभ घेतला आहे. संस्थेमार्फत स्वावलंबन प्रकल्पांतर्गत ६०४ बचत गट कार्यान्वित आहेत. तसंच कलादालन प्रकल्पांतर्गत भेटकार्ड, मेणबत्ती तयार करणं, याचबरोबर टेलरिंग, ब्यूटिपार्लर असं विविध प्रशिक्षण ५१२० महिलांनी यशस्वीपणे घेतलं आहे. संस्थेचा महाराष्ट्रासह इतर राज्यांत विस्तार मोठा आहे. सर्व अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व हिंसाचाराला बळी पडलेल्या, नातेवाइकांनी नाकारलेल्या महिलांना, तसंच मानसिक विकलांग महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी संस्थेला समाजातील सर्व स्तरांमधून सामूहिक मदतीची गरज आहे.

‘माहेर’ ला हवी समाजाची मदत…

‘माहेर’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. समाजातील दानशूर व्यक्ती व काही संस्था यांच्या मदतीमुळं संस्था चालते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘माहेर’च्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती -तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन ‘माहेर’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here