विराटने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. अनेकांनी विराटचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या वर्षी आई-बाबा बनले. या वर्षाच्या सुरवातीलाच विरुष्का जोडीने मुलगी झाल्याची गुड न्यूज दिली. त्यानंतर ते वारंवार चर्चेत राहिले. विरुष्काच्या मुलीला पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत. एका चाहत्याने विराटला मुलीचा चेहरा कधी दाखवणार असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विराटने इन्स्टाग्राम सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
वामिका हे दुर्गा देवीचं नाव
विराटला एका फॅनने प्रश्न विचारला की, वामिका याचा अर्थ काय होतो? ती कशी आहे? आणि मी तिला पाहू शकतो का? तेव्हा विराट म्हणाला की, ‘वामिका हे दुर्गा देवीचं दुसरं नाव आहे. वामिकाला जोपर्यंत सोशल मीडियाची समज येत नाही, आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय हे तिला समजत नाही, तोपर्यंत तिला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’

Also Read: आनंदाची बातमी, आयपीएल संदर्भात BCCI चा मोठा निर्णय
विराटने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. काहीजणांनी विराटचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. विराट आणि अनुष्का यांनी २०१७मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर तीन वर्षांनी ११ जानेवारी २०२१ रोजी त्यांना कन्यारत्न झाले. विरुष्काला कन्यारत्न होणार अशी भविष्यवाणी बंगळुरूमधील एका ज्योतिषाने केली होती. ती खरी ठरली. विराटच नव्हे तर अनुष्कानेही आपल्या मुलीचा चेहरा न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी खासगी आयुष्यात माध्यमांनी ढवळाढवळ करू नये, असे आवाहनही केले होते.
Also Read: सुशील कुमारच्या पोलिस कस्टडीत वाढ
दरम्यान, विराटसह टीम इंडियातील अनेक खेळाडू हे सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये क्वॉरंटाइन आहेत. विराट सेना पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान साउथम्प्टन मैदानात हा सामना रंगणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
क्रीडा विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Esakal