

गोडवा देणारा नैसर्गिक आयुर्वेदिक घटक म्हणून खडीसाखरेचा उपयोग आपल्या देशात गेली कित्येक शतके केला जात आहे. खडीसाखर शरीराला थंडावा देऊन त्यामध्ये चैतन्य निर्माण करते. वात, पित्त व कफ या दोषांना शांत करण्याचा गुणधर्म खडीसाखरेमध्ये असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर होतो. कफ पाडणाऱ्या औषधाचे गुणधर्म देखील खडीसाखरेमध्ये असतात.

भारतीय स्वयंपाकात अगदी दररोज वापरला जाणारा, सामान्य पदार्थ म्हणजे जिरे. हे एवढेसे जिरे पण त्यामध्ये जितके लोहाचे प्रमाण आहे तितके लोह असणारे इतर खाद्यपदार्थ फारच कमी आहेत. याशिवाय टर्पेनेस, फिनोल्स, फ्लेव्होनॉइड्स आणि अल्कलॉइड्स यासारखी संयुगे देखील त्यामध्ये आढळतात. सूक्ष्म जीवाणूविरोधी, कर्करोगरोधक आणि मधुमेहविरोधी गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये जिऱ्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो.

भरपूर प्रमाणात फायबर, क जीवनसत्त्व आणि पोटॅशियम असलेली चिंच म्हणजे दक्षिण भारतीय स्वयंपाकातील अविभाज्य पदार्थ आहे. चिंचेच्या झाडावरील फुले, फळे, पाने व खोडासह सर्व भाग आयुर्वेदिक औषधे बनवताना वापरले जातात. विविध त्वचा विकार, अतिसार, पचनाचे आजार, हृदयविकार आणि इतर अनेक आजारांवरील उपचारांमध्ये चिंचेच्या फळाचा वापर केला जातो.

बहुतेक सर्व भारतीय पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंट, मधुमेहविरोधी, दाहरोधक आणि सुक्षजंतूविरोधी क्षमता असतात. श्वसनाचे आजार, मधुमेह आणि क्षय या रोगांवरील औषधे तयार करताना आयुर्वेदात दालचिनीचा उपयोग केला जातो.

भारत आणि मध्य पूर्वेमध्ये वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. वेलची मध्ये क जीवनसत्त्व, मँगनीज आणि फायबर यांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्व दोषांचे (वात, पित्त आणि कफ) संतुलन साधण्याच्या गुणधर्म तिच्यात आहे. त्याचबरोबरीने अति प्रमाणात जमा झालेले श्लेष्मल कमी करून फुफ्फुसातील व पोटातील कफ कमी करण्याची क्षमता देखील वेलचीमध्ये आहे.

प्राचीन चरक संहितेमध्ये काळ्या मिरीचा उल्लेख आहे, सर्दी, खोकला, घशातील सूज, फुफ्फुसाच्या नळ्यांना येणारी सूज, अस्थमा तसेच जठर व आतड्यांचे विकार, रक्ताभिसरणातील त्रास या व्याधींवरील औषधांमध्ये आयुर्वेदिक वैद्य काळ्या मिरीचा उपयोग करत आले आहेत. अँटिऑक्सिडंट व शुद्धीकरण क्षमता काळ्या मिरीमध्ये आहेतच, शिवाय काळी मिरी पोषकद्रव्ये शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढवते.

आल्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे व क्षार मोठ्या प्रमाणावर असतात. जीवनसत्त्व क, ब६, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फोलेट, फॉस्फरस, झिंक, रिबोफ्लेवीन आणि नियासिन हे आल्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळून येतात. आल्यापासून सुंठ पावडरही तयार करता येते. या सुंठेमध्ये दाहशामक, जंतुरोधक, विषाणूरोधक गुण आहेत.
Esakal