लिस्मोर (ऑस्ट्रेलिया) – इंटरनेट (Internet) जगताची पहिली ओळख करून देणाऱ्या ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ (Internet Explorer) हे आणखी केवळ एक वर्ष सुरु राहिल, असे ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीने (Microsoft Company) काही दिवसांपूर्वीच जाहीर केले आहे. ‘मायक्रोसॉफ्ट एज’ (Microsoft Edge) या नव्या वेब ब्राऊजरसाठी (Browser) आधीचे ब्राऊजर बंद करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. (Internet Explorer Last One Year Microsoft Company)
वेब ब्राऊजिंगची प्रभावी सुरुवात करून देणाऱ्या ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ला असलेला सपोर्ट १५ जून २०२२ पर्यंतच कायम ठेवला जाणार आहे. अनेक युजर आतापासूनच ‘मायक्रोसॉफ्ट एज’चा वापर करत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ची पीछेहाट का झाली, मायक्रोसॉफ्टला नवीन ब्राऊजर का आणावे लागले, ‘गुगल’शी स्पर्धेचा कितपत परिणाम झाला, याबाबत तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चा सुरु असून सदर्न क्रॉस विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. विन्ह बुई यांनी याबाबत पुढील काही कारणे सांगितली आहेत.

उत्तराचा शोध
आपल्याला एखादी गोष्टीबाबत इंटरनेटवरून माहिती शोधायची असल्यास आपण गुगलचा आधार घेतो. या क्षेत्रातील २५ वर्षांचा इतिहास असूनही मायक्रोसॉफ्टला हे साध्य करता आलेले नाही. याचे कारण म्हणजे बाजारातील वाटा. इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करून नंतर गुगलद्वारे हवी ती माहिती शोधण्यापेक्षा, थेट गुगलचेच ‘क्रोम’ हे सर्च इंजिन वापरणे अनेकांना सोयीचे जाते.
यशामुळे दुर्लक्ष
वेब ब्राऊजिंगच्या सुरुवातीच्या काळात, म्हणजे १९७० च्या दशकात ज्यावेळी पर्सनल कॉम्प्युटर हा प्रकार फारसा नव्हता, त्यावेळी अत्यंत किचकट, अनाकर्षक अशी युनिक्सवर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम होती. त्यावेळचे नेटस्केप हे वेब ब्राऊजरही असेच होते. अशा वेळी मायक्रोसॉफ्टने या क्षेत्रात उडी घेत पर्सनल कॉम्प्युटर तयार करण्यावर भर दिला. १९९५ मध्ये ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ची सुरुवात झाली, त्यावेळी मायक्रोसॉफ्टने डिजिटल क्षेत्रात वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, येथूनच त्यांची घसरण सुरु झाली. हे यश मिळाल्यानंतर त्यांनी ‘इंटरनेट एक्सप्लोरर’मध्ये, टॅब ब्राऊजिंग, सर्च बार असे काळानुरुप बदल करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
Also Read: बिल गेट्स -मेलिंडा घटस्फोटावर तस्लिमा नसरीन म्हणतात…
अकार्यक्षमता
काळानुसार बदल न केल्याने ‘इंटरनेट एक्सप्लोरर’चा ग्राहक वर्ग दूर गेला. मायक्रोसॉफ्टमधील सॉफ्टवेअर डेव्हलपरनेच ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ वापरण्याचे तोटे जाहीर केले होते. याशिवाय, मोबाईलवरूनच इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढल्याने अनेक डिव्हाइसवर उपयुक्त ठरु शकेल, अशी ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ची क्षमता नसल्याचाही त्यांना तोटा झाला.
स्पर्धेत मागे पडलेल्या ‘इंटरनेट एक्सप्लोरर’मध्ये सुधारणा करण्याऐवजी आता कंपनीने मायक्रोसॉफ्ट एज हे नवे ब्राऊजर लाँच केले आहे. मात्र, या डिजीटल क्षेत्रात, त्यांच्यासमोर गुगलच्या ‘क्रोम’, ॲपलच्या ‘सफारी’ आणि मोझिलाच्या ‘फायरफॉक्स’सह अनेक ब्राऊजरचे आव्हान आहे.
Esakal