चीनच्या वुहानमधून उदयास आलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. मागील दीड वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूचे नवनवीन व्हेरियंटही आले. एकापेक्षा एक घातक अशा कोरोना व्हेरियंटनं लाखोंचे बळी घेतले. कोरोना व्हेरियंटवरुन वादही निर्माण झाले होते. त्यामुळेच कोरोना व्हेरियंटचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) नामकरण केलं आहे. प्रत्येक व्हेरियंटला ग्रीक अल्फाबेटनुसार नावं दिल आहे. भारतात आढळलेल्या कोरोनाच्या व्हेरियंटला WHO नं डेल्टा आणि कप्पा असं नाव दिलं आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये भारतात आढळून आलेल्या B.1.617.2 या स्ट्रेनला डेल्टा असं नाव देण्यात आलं आहे. तर मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला कप्पा असं नाव देण्यात आलं आहे. या कोरोना व्हेरियंटनी भारतामध्ये हाहा:कार माजवला. या विषाणूचा अनेक देशांमध्ये संसर्ग झाला.
कोरोनाच्या नामकरणासाठी WHO ने जगभरातील एक्सपर्ट ग्रुपची मदत घेतली. त्याशिवाय नॉमनक्लेचर, विषाणू टॉक्सोनॉमिक एक्सपर्ट, रिसर्चर्स आणि राष्ट्रीय प्राधिकरण यांचाही समावेश होता. मागील दीड वर्षांपासून जगभरात कोरोनाचे वेगवेगळे स्ट्रेन निर्माण झाले. करोनाच्या विषाणूमध्ये बदल झाल्याने हे स्ट्रेन निर्माण झाले असून, त्याच्या नावांवरून गोंधळ निर्माण झाला होता, वादही होताना दिसत आहे. या सगळ्या गोंधळावर जागतिक आरोग्य संघटनेनं मार्ग काढत, विविध देशात आढळून आलेल्या कोरोना स्ट्रेनचं नामकरण केलं आहे.
Also Read: दुसरी लाट आटोक्यात, मृतांची संख्या तीन हजारांच्या खाली
ब्रिटेनमध्ये सप्टेंबर 2020 मध्ये आढळलेल्या व्हेरियंटचं नाव ‘अल्फा’ असं ठेवण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या स्ट्रेनचं नाव ‘बीटा’ असं ठेवलं आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आढळलेल्या स्ट्रेनचं नाव ‘गामा’ ठेवलं आहे. अमेरिकेत आढळलेल्या स्ट्रेनचं नावं ‘एप्सिलॉन’ तर जानेवारी 2021 मध्ये फिलीपाईन्समध्ये आढळलेल्या स्ट्रेनचं नाव ‘थीटा’ ठेवण्यात आलं आहे.

भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरियंटनंतर वाद निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं सोशल मीडियाला भारतीय स्ट्रेन असा उल्लेख काढण्याचे आदेश दिले होते.
Esakal