नितळ गोरी त्वचा, देखणं रुप, सुडौल शरीर म्हणजे सुंदर दिसणं, असा अनेकांचा समज असतो. मात्र सौंदर्याची परिभाषा ही वेळोवेळी अनेक माध्यमांतून नव्याने मांडण्यात आली आहे. ‘आपण जसे आहोत तसे स्वीकारा, तेच खरं सौंदर्य आहे’, अशी शिकवण या खास फोटोमधून देण्यात आली आहे. ‘रावन फ्युचर प्रॉडक्शन्स’अंतर्गत भरत दाभोळकर, अभिजीत पानसे आणि अनिता पालंडे यांनी ही अनोखी संकल्पना २०२१ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला अंमलात आणली. या विशेष कॅलेंडर शूटच्या माध्यमातून त्यांनी शारीरिक सकारात्मकतेची जणू मोहीमच सुरू केली आहे. आतापर्यंत या फोटोशूटमध्ये ‘कबीर सिंग’मधील अभिनेत्री वनिता खरात, अलिझे खान, क्वीन इबेलेमा अबाली, अभिमान उनवणे, सोनाली नाडकर आणि ऋतुजा पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.
वर्ण, उंची यांपलीकडे जाऊन पाहिल्यास, सौंदर्याची खरी परिभाषा समजेल, हेच या फोटोशूटमधून अधोरेखित करण्यात आलं आहे.
प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरने या कॅलेंडरसाठी फोटोग्राफी केली आहे. या अनोख्या संकल्पनेतून एक सकारात्मक विचार पोहोचवता यावा, हा यामागचा हेतू आहे.