२०२०-२१ आर्थिक वर्षात भारताचा ‘जीडीपी’ ७.३ टक्क्यांनी घसरला. जो मागील ४० वर्षांमधील नीचांकी ‘जीडीपी’ आहे.
नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ मध्ये भारताचा विकास दर वा एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ९.३ टक्के असेल, तर पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२२-२३ मध्ये ७.९ टक्के असू शकेल, असा अंदाज अमेरिकी पतमानांकन संस्था ‘मूडीज इनव्हेस्टर्स सर्व्हिसेस’ने व्यक्त केला आहे. त्यामुळे ‘जीडीपी’ला चालू वर्षात ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षा आहे.
‘मूडीज’ने म्हटले आहे, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील अनेक भागांत लॉकडाउन असला तरी निर्बंध काहीसे शिथिल असल्याने अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झालेला नाही. मागील वर्षी अर्थव्यवस्थेवर जेवढा परिणाम झाला होता, त्या तुलनेत या वर्षीचे चित्र दिलासादायक असणार आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक सिद्ध झाली आहे. मात्र, सध्या दररोजच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाल्यामुळे परिस्थिती सुधारण्याची आशा वाढली आहे.
गेल्या ४० वर्षातील नीचांकी ‘जीडीपी’
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ आर्थिक वर्षात भारताचा ‘जीडीपी’ ७.३ टक्क्यांनी घसरला. जो मागील ४० वर्षांमधील नीचांकी ‘जीडीपी’ आहे. यापूर्वी १९७९-८० या वर्षांत ‘जीडीपी’ उणे (-) ५.२ टक्के नोंदविला गेला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील उणे विकास दर हा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या उणे (-) ८ टक्के आणि रिझर्व्ह बँकेच्या उणे (-) ७.५ टक्के अंदाजानजीक आहे. आर्थिक वर्षाच्या गेल्या चारपैकी दोन तिमाही उणे स्थितीत गेल्या आहेत, तर एका तिमाहीत शून्य विकास दर नोंदविला गेला.
Also Read: राज्यात पुन्हा मृतांची संख्या वाढली; कोल्हापूरमध्ये सर्वाधिक

Also Read: केरळमध्ये लवकरच मॉन्सूनच्या सरी पडतील
विकास दर (२०२०-२१)
एप्रिल-जून २०२० : उणे (-) २४.४ टक्के
जुलै-सप्टेंबर २०२० : उणे (-) ७.३ टक्के
ऑक्टोबर-डिसेंबर २०२० : ०.४ टक्के
जानेवारी-मार्च २०२१ : १.६ टक्के
एकूण आर्थिक वर्ष : (-) ७.३ टक्के
Esakal