पुणे: कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून बच्चे कंपनी घरातच आहे. ऑनलाइन शिक्षण व मनोरंजनासाठी त्यांचे जग आता केवळ मोबाईलचे स्क्रिनपुरते मर्यादित आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यासह वर्तणुकीवरही परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. सध्या मुलांबरोबरच मोठी मंडळीही ‘वर्क फ्रॉम होम’मुळे चार भिंतीत बंद असल्याने सर्वांनाच घर खायला उठत आहे. त्यामुळे प्रत्येकानेच मानसिक आरोग्य जपायला हवे, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

ससून सर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख व सहयोगी प्राध्यापक डॉ. नितीन अभिवंत म्हणाले, ‘‘मुलं एकमेकांना बघत काहीतरी शिकत असतात. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणातून मुलांना किती समजत आहे, याची कल्पना नाही. त्याचबरोबर त्यांची शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे आळस वाढत आहे. मैदानी खेळातून मिळणारा उत्साह, आनंद यांपासून मुले सध्या वंचित आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मोठ्यांमध्येही चिडचिड आणि राग वाढत असून, अनेक कुटुंबात तणावाचे वातावरण आहे. परिणामी मुलांमध्ये चिडचिड, हट्टीपणा वाढतो. या सर्व गोष्टींमुळे मुलांच्या मानसिकतेवर होत असलेल्या प्रभावामुळे भविष्यात त्यांच्या वर्तणुकीतील दोष वाढण्याची दाट शक्यता आहे.’’

Mental Health

पालकांमध्ये संयमाची गरज

सध्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अनेक नोकरदार घरीच आहेत. सतत चार भिंतीत असल्याने घरातील मोठ्या व्यक्तींमध्ये वाद होणे स्वाभाविक आहे. तर अनेक वेळा पालक कामाच्या ताणात मुलांशी संवाद किंवा वेळ घालविणे टाळतात. त्यामुळे मुले करमणुकीसाठी मोबाईलचा जास्त वापर करतात. मुले मोठ्यांचे पाहून गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पालकांनी संयम बाळगणे व मुलांशी सतत संवाद ठेवणे गरजेचे आहे, असेही डॉ. अभिवंत यांनी सांगितले.

”मनोरंजन, गेमिंग व डिजिटल शिक्षणामुळे मोबाईलच मुलांचा मित्र झाला आहे. त्यांची शारीरिक क्रिया कमी झाली आहे. मोबाईलवरील विविध प्रकारच्या गोष्टींना पाहून मुलांच्या वर्तनातील बदल सहज दिसून येतोय. यासाठी पालकांनी मुलांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या अॅक्टिव्हिटी करायला पाहिजे.”

– डॉ. श्रीकांत पवार, विभाग प्रमुख, मनोविकृती सामाजिक कार्य, मानसिक आरोग्य संस्था

children

हे करा

– घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा

– तणावाचा परिणाम बालमनावर जास्त होतो, हे लक्षात घ्या

– कामाच्या ताणामुळे होत असलेली चिडचिड मुलांवर काढू नका

– मुलांशी भरपूर संवाद साधा व त्यांना पुरेसा वेळ द्या

– मैदानी खेळांवर मर्यादा असल्यामुळे मुलांना घरातच विविध गोष्टी करायला द्या

समुपदेशनासाठी करा संपर्क

मुलांमध्ये वाढत असलेल्या मानसिक ताणाबाबत पालकांनी काय काळजी घ्यावी, यासाठी पालकांचे समुपदेशन केले जाते. यासाठी ०२०-२६१२७३३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here