औरंगाबाद: सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकाने उघडण्याच्या मुद्द्यावरून खासदार जलील यांनी कामगार उपायुक्तांना घेराव घालत दंडाबद्दल जाब विचारला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार अधिकाऱ्याने केल्यानंतर खा. जलील यांच्याविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोरोना निर्बंध शिशिल (covid 19 lockdown) केल्यानंतर ज्या दुकानांवर प्रशासनाकडून सील लावण्याची कारवाई करण्यात आली होती, त्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना भरमसाठ दंड आकारण्यात आला. दुकान उघडायची असेल तर आधी दंड भरा अशी भूमिका घेत, कामगार उपायुक्त कार्यालयाने ५ ते ५० हजारांपर्यंतच दंड आकारला. यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांना दिली आणि त्यांनी कामगार उपायुक्त कार्यालय गाठले. व्यापारी आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी कामगार उपायुक्तांना मंगळवार (ता.१) रोजी घेराव घालत या दंडाबद्दल जाब विचारला होता.
Also Read: जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठ्याची फोटोंमधून करा सैर
दोनशे रुपरे स्केवअर फूट या दराने दंड आकारला जात असल्यामुळे तो कसा भरावा, असा सवाल करत व्यापाऱ्यांनी इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली कामगार उपायुक्तांना धारेवर धरले होते. यावेळी इम्तियाज जलील देखील आक्रमक झाले होते. व्यापाऱ्यांना न्याय देऊन, त्यांची दुकाने उघडली जात नाही, तोपर्यंत तुम्हाला खुर्चीवरून उठू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, शहरात निर्बंध असताना जास्त वेळ दुकान सुरू ठेवले, किंवा व्यवहार केला म्हणून प्रशासनाने ५६ दुकानावर कारवाई करत सील लावले होते. ५ मे पासून या दुकांना बंद होत्या, या काळात व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील कामगारांना पगार दिला, त्यामुळे त्यांचे घर चालले. बंद काळात ज्यांनी दुकाने जास्त वेळ सुरू ठेवली त्यांनी काही गुन्हा केला नाही, कामगारांचे पोट भरण्यासाठीच व्यापाऱ्यांनी ते केले. तिथे काही अवैध धंदे सुरू नव्हते.
Esakal