मानवी इतिहासात काही शोधांनी जगाचाच चेहरा-मोहरा बदलून टाकला. त्यातलाच एक शोध होता, तो चाकाचा! चाकाच्या शोधाने माणसाला गतीमान केलं. माणसांचं विश्व धावतं झालं. दोन चाकांच्या सहाय्यावर स्वत:चाच समतोल साधत सुसाट धावता येणाऱ्या सायकलची निर्मिती हा याच प्रगतीमधला एक महत्त्वाचा टप्पा. याच सायकलच्या शोधाने विनाश्रम धावत्या वाहनाच्या शोधाला प्रेरणा मिळाली. चाकाच्या शोधापासून ते आता स्वयंचलित वाहनाच्या शोधापर्यंतचा हा प्रवास आहे. यातील सायकल हा घटक आजही मानवी जगाचे अविभाज्य अंग आहे. सायकल किंवा दुचाकी हे मानवी शक्तीद्वारे पायाने गती देऊन चालणारे एक उत्तम वाहन आहे. एका सरळ रेषेत बसविलेली दोन चाके, लोखंडी पातळ नळ्यांची त्रिकोणाकृती चौकट, बैठक, तोल सांभाळणारे व दिशा बदलणारे हँडल, गती देणारे दोन पायटे, दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक हे सामान्य सायकलचे मुख्य भाग होत. या वाहनाला आजचे प्रगत रुप प्राप्त होण्यासाठी अनेक संशोधकांचे आणि 1750 सालानंतरचे अडीचशे वर्षांतील श्रम कारणीभूत आहेत. आजही जगाच्या अनेक भागांत यांत्रिक दळणवळणाचे हे महत्त्वपूर्ण साधन आहे. (World Bicycle Day 2021 know history of bicycles sell of bicycles in India Know all about bicycles)

एम. डी. सिव्हर्क या फ्रेंच इसमाने 1690 साली पहिल्यांदा सायकलसदृश्य वाहन तयार केले. दोन लाकडी चाकांना दांड्यांनी जोडल्यानंतर जी रचना तयार झाली, त्यातील दांड्यावर बसून दोन्ही बाजूचे पाय जमिनीला रेटत रेटत पुढे रेमटवले जाणारे हे वाहन! यात कालांतराने आणखी भर पडत गेली. 1816 मध्ये बॅरन कार्ल वॉन ड्रेस यांनी हे वाहनाला दिशा देण्यासाठी म्हणून पुढील चाकावर एक हँडल बसवले. मात्र, सायकल रेमटवण्याची पद्धत तीच राहिली. 1840 मध्ये पुढील चाकाच्या आसाला पायाने गती देता येईल, असे पायडल बसविण्यात आले. हो! लहान मुलांच्या तीन चाकी सायकलींना सध्या जसे पायडल असते अगदी तसेच. यानंतर यात आणखी सुधारणा झाली. 1876 मध्ये एच.जे लॉसन यांनी एक साखळी वापरुन मागच्याही चाकाला गतीमान करण्याची पद्धत सुरु केली. आणि यानंतर साकार झाली ते आताच्या आधुनिक सायकलचे प्रारुप! यानंतर मग 1887 साली जॉन बॉइड डनलॉप यांनी रबरी टायरची भर घातली आणि सायकलच्या जीवात खऱ्या अर्थाने जीव आला.

अर्थात दरम्यानच्या काळात सायकलच्या मॉडेल्समध्ये नानाविध प्रकारचे प्रयोग झाले. तीनचाकी सायकल, चारचाकी सायकल, कपल्ससाठीची सायकल या आणि अशा प्रकारच्या मॉडिफिकेशनच्या सायकलच्या इतिहासात पहायला मिळालेत. तिथंपासून ते आता हायब्रिड आणि हायटेक गिअर्ड सायकलपर्यंतचा इतिहास हा रंजक आहे. स्कूटर भारतात सर्वसामान्य व्हायच्या आधी भारतात सायकल हेच मध्यमवर्गीयांसाठीचे ‘स्टेटस सिम्बॉल’ होते. अगदी पत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमनची अथवा दुध घेऊन येणाऱ्या गवळ्याची आपल्या मनातील आताची प्रतिमा देखील सायकलवरचीच असते. शोर चित्रपटामध्ये मनोज कुमार याच सायकलवरच्या फेऱ्या मारुन पैसे कमावताना दिसून येतो. गरीबाच्या सुखदुखात जीवनसाथीची भुमिका सायकलने एकेकाळी निभावली होती. सध्या लहान मुलांसाठीचे खेळणे अथवा हेल्थ कॉन्शिअस म्हणवून घेणाऱ्या लोकांचे चोचले, या प्रकारच्या दृष्टीकोणातूनच सायकला वावर दिसून येतो. सध्या वर्दळीच्या आणि धावपळीच्या जगात सायकलवाल्यांचं गाव तसं विरळचं!

भारतातील सायकलचं मार्केट

मात्र, असं असलं तरीही भारतातील सायकलचं मार्केट भलंमोठं आहे. जवळपास 16.3 दशलक्ष सायकल्स दरवर्षी भारतात विकल्या जातात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांकडून सायकलच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. इतकी की अनेक शहरांमधील ग्राहक आपल्या आवडीच्या सायकलसाठी वेटींगवर रहायला तयार झाले. याचं एकमेव मुख्य कारण म्हणजे कोरोना काळात लोकांना आरोग्यसंबंधीचं महत्त्व अधिक अधोरेखित झालं आणि लोकांनी व्यायामासाठीचा सर्वांत स्वस्त पर्याय म्हणून सायकलकडे आपला मोर्चा वळवला. All India Bicycle Manufacturers Association (AICMA) ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 2019-20 या वर्षामध्ये एकूण 1,28,16,733 सायकल्सची विक्री झाली आहे. यातील मे ते सप्टेंबर 2020 या पाच महिन्यांच्या कोरोनाकाळात एकूण 41,80,945 सायकल्स विकल्या गेल्या आहेत. ही विक्री अभूतपूर्व अशी आहे. सायकलच्या मागणीमध्ये झालेली ही वाढ आश्चकार्यक आहे. मे महिन्यामध्ये 4,56,818 सायकल्सची विक्री झाली. त्या पुढच्याच महिन्यात, जूनमध्ये हा आकडा दुप्पट झाला आणि तब्बल 8,51,060 सायकल्स विकल्या गेल्या. तर सप्टेंबर महिन्यात यामध्ये आणखी वाढ होऊन 11,21,544 सायकल्स विकल्या गेल्या. भारतातील सायकलचा सेल लॉकडाऊननंतर तब्बल 300 ते 600 टक्क्यांनी वाढल्याचे सायकल निर्मिती क्षेत्रातले जाणकार सांगतात.

प्रदुषणावर रामबाण उपाय, ट्राफिकची आणि पार्किंगच्या समस्येवर तोडगा, ध्वनी प्रदुषण नाही, स्वस्त आणि वाहतुकीस सोपे, इंधनाची बचत आणि याशिवाय सायकलचे आरोग्यासाठीचे महत्त्व वादातीत आहे. याचाच उल्लेख करत युनायटेड नेशन्सनी 2018 सालापासून 3 जून हा दिवस ‘वर्ल्ड बायसिकल डे’ म्हणून साजरा करण्यास सुरवात केली आहे.

बायसिकल इंडस्ट्रीचा भारतातला उगम 1939 मध्ये सुरु झाला. पाश्चिमात्त्य देशांमध्ये या इंडस्ट्रीचा उदय तसा जुनाच. भारतात बिर्ला कंपनीद्वारे हिंद सायकल लिमिटेड कंपनी मुंबईत तर हिंदुस्तान बायसिकल कोर्पोरेशनची स्थापना पाटण्यात झाली. या कंपन्यांद्वारे मुख्यत: बायसिकल्सचे पार्ट्स तयार केले जायचे. मात्र, खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतातील बायसिकल आणि त्यातील घटकांचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन सुरू झाले, कारण तेव्हापर्यंत महत्त्वाचे सर्व भाग आयात केले जात होते. त्यानंतर सायकल इंडस्ट्री केवळ दहा वर्षांच्या कालावधीत स्वावलंबी बनली. सध्या भारतातील बायसिकल इंडस्ट्री सरासरी 15.5 दशलक्ष सायकल्सची निर्मिती वर्षाकाठी करते. एकूण जगातील सायकल्सच्या निर्मितीच्या 10 टक्के सायकल्स या भारतात तयार होतात. आणि याची किंमत ही जवळपास 1.5 बिलियन इतकी आहे. सायकल इंडस्ट्रीमधून जवळपास 1 दशलक्ष लोकांना रोजगार मिळतो. यामध्ये विक्री आणि दुरुस्ती करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या रोजगाराचा समावेश आहे. भारतात जवळपास 11.1 कोटी घरांमध्ये सायकल्स असल्याचा अंदाज आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here