नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या हातातून आता सत्ता निसटून चालली असल्याचं चित्र आहे. बेंजामिन यांना पंतप्रधान पदावरुन काढून टाकण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये युती सरकार बनवण्यावर सहमती झाली आहे. सरकारमध्ये बेंजामिन यांचे सहकारी नेफ्टाली बेनेट विरोधी पक्षाचा नेता म्हणून उभे राहिले आहेत. विरोधी पक्षाला जर संसदेत बहुमत सिद्ध करु शकला तर नेफ्टाली इस्रायलचे पुढचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. (Israel Naftali Bennett can replace Netanyahu as Prime Minister)

Also Read: सीरम करणार स्पुटनिकची निर्मिती; DCGI कडे मागितली परवानगी
नेतन्याहूंच्या विरोधात 8 पक्ष एकत्र
आठ विरोधी पक्षांच्या दरम्यान युती सरकार बनवण्यावर सहमती झाली असल्याचं राष्ट्रपतींना कळवण्यात आलं आहे. नेतान्याहू हे इस्रायलचे एक शक्तीशाली राजकीय व्यक्ती आहेत. गेल्या 12 वर्षांपासून इस्रायलचे राजकारण त्यांच्याभोवतीच फिरत आहे.
इस्रायलच्या विरोधी पक्षाचे नेते येर लेपिड यांनी म्हटलंय की, पंतप्रधान पदावरुन नेतान्याहू यांना हटवण्यासाठी विरोधी पक्षांच्या दरम्यान युती सरकार बनवण्याबाबत सहमती झाली आहे. 120 जागांच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष जर बहुमत सिद्ध करु शकले तर सर्वाधिक काळ सत्तेवर राहणाऱ्या नेतान्याहू यांचं पंतप्रधान पद संपुष्टात येऊ शकतं. या विरोधकांच्या युतीमध्ये डावे, उजवे आणि मध्यममार्गी अशा सर्व प्रकारचे पक्ष सामील झाले आहेत. या पक्षांमध्ये अनेक प्रकारचे मतभेद आहेत मात्र नेतन्याहू यांना पदावरुन पायउतार करण्यासाठी हे सर्वच पक्ष सध्या एकत्र आल्याचं चित्र आहे.

…तर बेनेट राहतील 2023 पर्यंत इस्रायलचे पंतप्रधान
विरोधी पक्षांमध्ये एकमत झाल्यानंतर विरोधी पक्षनेते येर लेपिड यांनी म्हटलंय की, मी यशस्वी झालो आहे. मी वचन देतो की, आमचं सरकार मत देणाऱ्या तसेच न देणाऱ्या सर्वांसाठीच काम करेल. या आठ पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार, पंतप्रधान पदाचा कारभार आळीपाळीने वेगवेगळ्या पक्षांचे नेते सांभाळतील. सर्वांत आधी उजव्या विचारसरणीच्या यामिना पक्षाचे नेते नेफ्टाली बेनेट हेच पंतप्रधान बनतील.
बेनेट हे 2023 पर्यंत इस्रायलचे पंतप्रधान पदावर राहतील. त्यानंतर हे पद लेपिड यांच्याकडे जाईल. विरोधी पक्षांमध्ये सहमती झाल्यानंतर आता देशातील राजकीय अस्थिरता समाप्त झाली आहे. खरं तर सध्याच्या सरकारला 2 जूनच्या रात्रीपर्यंत संसदेत बहुमत सिद्ध करायचं होतं मात्र लेपिड यांनी याआधीच युती सरकार बनवण्याची घोषणा केली आहे.
…तर दोन वर्षांत पाचव्यांदा होणार निवडणूक
राजकीय विश्लेषक असं म्हणतात की, युती सरकार बनवण्यावर सहतमी झाल्यानंतर देखील नेतन्याहू यांच्यासाठी शक्यता अजूनही संपुष्टात आलेल्या नाहीयेत. संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्षांकडे कमीतकमी एक आठवड्याचा वेळ आहे. या दरम्यानच्या काळात नेतन्याहू आणि त्यांची लिकूड पक्ष सरकार बनवण्यासाठी आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करु शकतात. जर विरोधक देखील बहुमत सिद्ध करु शकले नाहीत तर देशात दोन वर्षांच्या आतच पाचव्यांदा निवडणूक लावण्याची वेळ येऊ शकते. लेपिड यांनी गेल्या रविवारी बेनेट यांचं समर्थन मिळवलं. नेतान्याहू यांना सत्तेवरुन पायउतार करण्यासाठी लेपिड यांनी सात पक्षांसोबत समझोता केला आहे.
Esakal