महिला टेनिस जगतातील दुसऱ्या क्रमांकाची टेनिस स्टार नाओमी पाठोपाठ आता नंबर वनची खेळाडू असलेली ऑस्ट्रेलियाची अॅश्ले बर्टीने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघारी घेतलीये. फ्रेंच ओपन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात दुखापतीमुळे अॅश्ले बर्टीवर कोर्ट सोडायची वेळ आली. क्ले कोर्टवर लढतीला उतरण्यापूर्वीच सरावादरम्यान तिच्या दुखापतीने डोकेवर काढले होते. यातूनही ती कोर्टवर उतरली होती. पण तिच्यावर रिटायर्ड हर्ट होऊन स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली.
2019 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेतील 25 वर्षीय चॅम्पियन अॅश्ले बर्टीचा दुसरा सामना गुरुवारी पोलँडच्या मॅग्डा लिनेटे विरुद्ध रंगला होता. या सामन्यात ती 6-1, 2-2 असे पिछाडीवर होती. हातवारे करुन तिने पुढे खेळणार नसल्याचे सांगत कोर्ट सोडण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेतून माघार घेणं निराशजनक असल्याचे तिने म्हटले आहे. फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी तिने खूपच मेहनत घेतली होती. या स्पर्धेच्या तयारीसाठी तिने क्ले कोर्टवर 13 मॅचेस खेळल्या यातील 11 लढतीत तिने विजयही मिळवला होता. कोर्टवर उतरण्यापूर्वीच तिला दुखापत होती. पायाला पट्ट्या बांधून ती कोर्टवर उतरल्याचे पाहायला मिळाले. तिला सरळ चालताही येत नव्हते.

Also Read: लढवय्यी नाओमी ड्रिप्रेशनलाही हरवेल!
पहिल्या सेटमध्ये तिने मेडिकल टाईम आउटही घेतला. फ्रेंच ओपन स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या बनार्नाडा पेरा विरुद्ध तिला चांगलाच संघर्ष करावा लागला होता. या सामन्यानंतर तिने शंभर टक्के फिट नसल्याचे सांगितले होते. खेळण्यासाठी जे करता येईत ते सर्व केले. पहिल्या सामन्यासाठी कोर्टवर उतरलो आणि जिंकलो हे चमत्कारिकच होते. दुसऱ्या लढतीत खेळणं आणखी कठिण झाले. उभा रहाणंही शक्य नसल्यामुळे गेम सोडावा लागला, असे बर्टीने रिटायर हर्ट होऊन परतल्यानंतर सांगितले.
Also Read: इंग्लंड दौऱ्यावर स्मृतीची झोप भुर्रकन उडून जाते!

नंबर वन महिला खेळाडूने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेण्यापूर्वी जपानच्या नाओमी ओसाकाने स्पर्धेतून माघार घेतली होती. मानसिक तणावामुळे स्पर्धेतून माघार घेत असल्याचे तिने म्हटले होते. डिप्रेशनचा सामना करत असल्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर येण्यास नकार दिल्याचेही तिने स्पष्ट केले होते. तिच्या या निर्णयामुळे आयोजकांनी तिला 11 लाख रुपये दंड केला होता. या प्रकरणामुळे फ्रेंच टेनिस फेडरेशनवर प्रश्नांची बरसात होत असताना आणखी एका नावाजलेल्या खेळाडूंने स्पर्धा सोडल्याची भर पडली आहे.
Esakal