शिराळा : धुळवाफ पेरणी बाबत आपण नेहमी ऐकतो व वाचतो पण नेमकी धुळवाफ पेरणी म्हणजे काय ? ती कुठे करतात. हे अनेकांना माहीत नाही. अनेकजण म्हणतात, भाऊ धुळवाफ म्हणजे काय ? याबाबत शिराळाचे तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील यांच्याशी साधलेला संवाद.

पाऊस पडण्यापूर्वी म्हणजे जून महिन्यापूर्वी जी पेरणी केली जाते, त्यास धुळवाफ पेरणी म्हणतात. यासाठी एप्रिल आणि मे महिण्यात शेतकरी शेतीची मशागत करतात. कुळवणे, पाटवणे या मशागतीमुळे शेतातील माती अगदी बारीक म्हणजे गुलालासारखी मऊ होते. ही कुळवणी, पाटवणी अंतिम टप्यात येते, त्यावेळी जमीन तापली असल्याने गरम पाण्यातून वाफ निघते त्याप्रमाणे बारीक झालेली माती वाफेप्रमाणे वर येते. तीच धुळवाफ असते.

ही पेरणी साधारण अति पावसाच्या ठिकाणी केली जाते. कारण जास्त पाऊस असणाऱ्या ठिकाणी चिखल व दलदल असल्यामुळे टोकण, कुरी, बांडगे, अशी पेरणी करता येत नाही. त्यामुळे पावसा पूर्वीच पेरणी केली जाते.

पूर्वी शिराळा तालुक्यात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पेरणी केली जात होती. आता मुहूर्त करून साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली जाते.

तालुक्यात ९९ टक्के पेरणी ही धुळवाफ होते. फक्त एक टक्का पेरणी ही रोप लावणं होते. ही रोप लावणं ही जुलै महिन्यात जास्त पाऊस पडल्यावर केली जाते.

शिराळा तालुक्यात एकूण १२ हजार पाचशे हेक्टर क्षेत्र असून त्या पैकी फक्त १५० हेक्टरवर रोप लावण केली जाते.

इंद्रायणी, कोमल, आर १, आर २४, अंकुर, सोनम,रोशनी, भोगावती, नाथपोहा, पार्वती, मधुमती, मेनका, राशी, पूनम,को ५१, या बियाण्यांचा वापर केला जातो.

८० टक्के पेरणी ही कुरी, बांडगं यांच्या साहाय्याने तर २० टक्के पेरणी ही टोकण पद्धतीने केली जाते.कुरी व बांडगे व कुरीच्या सहाय्याने पेरणी लवकर उरकले तर टोकण पद्धतीला मनुष्यबळ जास्त लागत असल्याने या पद्धतीचा कमी वापर केला जातो.


Esakal