पुणे : पीएमपीने बिझनेस प्लॅन मंजूर केला खरा, परंतु, अंमलबजावणी नेमकेपणाने व्हायला हवी. त्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घ्यायला हवा, अशी अपेक्षा स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी व्यक्त केली. तसेच शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी या प्लॅननुसार ‘बीआरटी’वर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.(Focus on BRT to implement PMP Business Plan Demand of NGO representatives)

पीएमपीच्या पुढील १५ वर्षांच्या वाटचालीसाठी बिझनेस प्लॅन तयार केला आहे. पीएमपीच्या संचालक मंडळाने त्याला मंगळवारी मंजुरी दिली. पुढील काळात लोकसंख्या वाढल्यावर बसची संख्या किती हवी, त्यासाठी बसची वारंवारिता कशी हवी, पीएमपीचे उत्पन्नाचे अन्य स्रोत कसे हवेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, खर्च कमी करून उत्पादकता कशी वाढवता येईल, वाढती लोकसंख्या आणि पीएमपीचे वाढते कार्यक्षेत्र लक्षात घेऊन हा बिझनेस प्लॅन तयार केला आहे.

pmp

Also Read: पुण्यात १४९ केंद्रांवर आज लसीकरण मोहीम

”पीएमपीमध्ये आर्थिक गुंतवणूक कोण व कशी करणार, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसेच उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता विकसित करण्याचा पर्याय सुचवला आहे. मात्र, कोथरूड स्थानकासारखी परिस्थिती होऊ नये. पीएमपीने मालमत्ता विकसित केल्यावर त्यातील जागा न विकता भाडेतत्त्वावर द्यावी. तसेच बीआरटीचे विस्तारीकरण व्हायला हवे.”

– सुजित पटवर्धन (परिसर)

”सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, हा प्लॅनचा उद्देश आहे. प्लॅनची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पीएमपीचे अध्यक्ष बदलले की, धोरणांत या पूर्वी बदल होत असे. आता अध्यक्ष कोणीही असले तरी, या प्लॅननुसार पीएमपीची कार्यपद्धती झाली तर, पीएमपीची सेवा लोकप्रिय होईल.”

– रणजित गाडगीळ (परिसर)

”हा प्लॅन मंजूर झाला, ही आनंदाची बाब आहे. परंतु यातील काही बारकावे पडताळण्याची गरज आहे. प्रमुखत: भविष्यातील ३६६२ ची बससंख्या ही संपूर्ण पुणे महानगरासाठी पुरेशी वाटत नाही. केवळ पुणे- पिंपरी चिंचवड महापालिकेची लोकसंख्या पाहता, इतक्या बसगाड्या केवळ शहरातच लागणार आहेत. हा प्लॅन राबविण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीचे काय, याचे बारकावे हवेत.”

-प्रांजली देशपांडे- आगाशे (अभ्यासक, सार्वजनिक वाहतूक)

”प्लॅनमध्ये मेट्रो, रिक्षा आदी वाहतुकीच्या घटकांचे एकात्मिकरण कसे करणार, याबद्दल स्पष्टता हवी. प्रवासी संख्या वाढविणे गरजेचे आहे, अन त्यासाठी काही उपाययोजना आहेत. परंतु, प्रवाशांनी बसमध्ये बसावे, यासाठी त्यांची मानसिकत कशी घडविणार, त्यासाठी आणखी उपाययोजनांची गरज आहे.”

– संजय शितोळे (पीएमपी प्रवासी मंच)

”पीएमपीची सेवा चांगली पाहिजे. शहराच्या कोणत्याही भागात बस ५- १० मिनिटांत मिळायला हवी. बस स्वच्छ आणि चांगल्या असाव्यात, या किमान अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात. प्लॅन कसा असो, प्रवाशांना किफायतशीर दरात प्रवास करण्याची सुविधा हवी.”

– गणेश जाधव (प्रवासी)

Also Read: राज्यात आता कोरोनाबरोबरच क्षयरोगाचेही आव्हान

बिझनेस प्लॅनकडून अपेक्षा

  • २०३१-३२ पर्यंत लोकसंख्येनुसार बस उपलब्ध होणार का ?

  • प्लॅनची अंमलबजावणी नेमकी आणि काटेकोर व्हायला हवी

  • बीआरटीच्या मार्गांची संख्या वाढणे गरजेचे

  • मेट्रोबरोबर सांगड घालणे गरजेचे

  • बस चांगल्या दर्जाच्या असाव्यात

  • प्रवास स्वस्त आणि सुलभ असावा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here