पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरुन वाद सुरु आहे. त्यातच आता आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. भाजपचे 33 आमदार तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
कोलकाता- पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरुन वाद सुरु आहे. त्यातच आता आणखी एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. भाजपचे 33 आमदार तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूलच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, आता या नेत्यांच्या घरवापसीची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपते राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांचे पुत्र शुभ्रांशु हेही तृणमूलमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कळंतय. (west bengal mamta banarjee tmc bjp mla mukul roy)
भाजप नेते मुकूल रॉय यांच्या पत्नीला कोरोना झाल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. यावेळी त्यांना भेटण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यानंतर या चर्चेला तोंड फुटले. असे असले तरी भाजपच्या नेत्यांनी या चर्चा अफवा असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुकूल रॉय यांच्याशी चर्चा केली असल्याचं कळतंय. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.

टीएमसी नेत्यांकडून 33 आमदारांचा आकडा सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजप नेते मुकुल रॉय कधीकाळी ममतांचे विश्वासू होते. पण, 2017 मध्ये त्यांनी भाजपची वाट धरली. भाजपने त्यांना महत्त्वाचं पदही दिलं. 2021 विधानसभा निवडणुकीत भाजपला म्हणावं तसं यश मिळालं नाही. मुकुल रॉय निवडणुकीत जिंकले, पण त्यांचा मुलगा शुभ्रांशु यांना पराभव स्वीकारावा लागला. यावेळी शुभ्रांशु यांची तृणमूलबाबत सहानुभूती पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता हॉस्पिटलमध्ये मुकुल रॉय आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काही उलथापालथ पाहायला मिळते का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Also Read: पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे भाव
विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवलाय. त्यामुळे ममता बॅनर्जींचे बंगालवरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालंय. पण, निवडणुकीच्या आधी अनेक तृणमूल नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ममतांचे विश्वासू सुवेंदू अधिकारी हेही भाजपमध्ये गेले होते. भाजपमध्ये मुकुल रॉय यांच्यापेक्षा सुवेंद्र अधिकारी यांचे प्रस्थ वाढत आहे. त्यामुळेही मुकुल रॉय स्वत:ला असुरक्षित वाटून घेत आहेत. त्यामुळे मुकूल रॉय यांचे हे दबाव तंत्र असल्याचीही शक्यता आहे.
Esakal