महाराष्ट्र- मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी केलेल्या अनलॉकच्या घोषणेमुळे गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. कारण, विजय वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने यावर अजून निर्णय घेतला नसल्याचं म्हटलं. या घटनांमुळे महाविकास आघाडीमध्ये विसंवाद असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कसलाही विसंवाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. वडेट्टीवार यांनी गोंधळानंतर आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचं ते म्हणाले. (congress balasaheb thorat said abot vijay wadettiwar and thackeray government)
विजय वडेट्टीवार अत्यंत जेष्ठ मंत्री आहेत. राज्यकारभाराचा त्यांना अनुभव आहे. पण, काही विषयांवर संभ्रम आहे. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यास हा संभ्रम दूर होईल. पण, सरकारमध्ये कसलाही विसंवाद नाहीये. सगळ्यांनी एकत्र मिळून काम करावं लागणार आहे, समन्वय वाढवावा लागेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत सुरु आहे. मुख्यमंत्री योग्यपणे काम करत आहेत. कोरोनासारख्या संकटात मुख्यमंत्री, मंत्र्यांनी चांगलं काम केलं. कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यास आपल्याला यश आलं आहे. सरकारनं अभूतपूर्ण यश मिळवलंय. आमचं प्राधान्य आरोग्याला आणि जीविताला राहिलं आहे. पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली. दुसरी लाट अधिक घातक होती, पण सरकारनं चांगलं काम करुन दाखवलं. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
Also Read: अनलॉकच्या गोंधळानंतर विजय वडेट्टीवारांची सावध प्रतिक्रिया
वडेट्टीवार यांनी गोंधळानंतर स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेस नेत्यांमध्ये काही विषयांबाबत संभ्रम असेल, तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तो प्रश्न मिटेल. त्यामुळे विसंवादाचा मुद्दा नाही, सरकारमध्ये समन्वय आहे. मुख्यमंत्री लवकरच अनलॉकबाबत घोषणा करतील, असंही ते म्हणाले. बाळासाहेब थोरातांनी ओबीसीच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. ओबीसीच्या विषयाबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मी मुख्यमंत्र्याची भेटणार आहेत. आमची मत मांडणार आहोत. सर्व समाज घटकांना घेऊन पुढं जायचंय. पण कुणावर अन्याय होऊ नये हेही पाहायचं आहे, असं ते म्हणाले.
Esakal