राज्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत सुरू होती बैठक

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे सह्याद्री अतिथीगृहात असताना एक अपघात (Accident) घडल्याची माहिती आहे. सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri Govt Guest House) मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळले. शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (Administrative Officers) बैठका घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरचं शोभेचं मोठं झुंबर (Slab with pop design) त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळलं. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी (No Casualties) झाले नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी असू शकली असती. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. (Aaditya Thackeray narrow escape in Accident Mumbai Sahyadri Government Guest House slab fallen with pop design)

गेस्ट हाऊसमधील कोसळलेला स्लॅब

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे हे आपल्या विभागातील काही महत्त्वाच्या कामांबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. काही विषयांवर बैठकी सुरू असताना सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सह्याद्री अतिथीगृहातील ही घटना काही काळ ठोका चुकवणारीच होती, पण सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. सह्याद्री अतिथीगृहातील हे बांधकाम अंदाजे 20 ते 25 वर्षांपूर्वीचे असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. बांधकाम विभाग अधिकारी यांची चौकशी केली जात असून या बांधकामाची तातडीने दुरुस्ती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

आदित्य ठाकरे यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करुन त्यांनी पुन्हा एकदा आपल्या खात्याचा कार्यभार सांभाळला. आदित्य ठाकरे हे कायम विविध विषयांच्या अनुषंगाने अधिकारी वर्गाशी बैठकांच्या माध्यमातून चर्चा करत असतात. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेत उद्धभवणाऱ्या धोक्यापासून मुंबईकरांना व महाराष्ट्रवासीयांना वाचवण्यासाठी ते कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा ते अधिकारी वर्गाकडून घेत असतात. अशाच काही बैठका आजही अधिकारी वर्गासोबत सुरू होत्या. बैठकीसाठी राज्यातील महत्त्वाचे अधिकारी मंडळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना अचानक हा अपघात घडला. पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. बैठक सुरू असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर हा स्लॅब कोसळला, त्यावेळी त्या जागी कोणीही नसल्याने मोठे संकट टळले. या घटनेनंतर सर्वच संबंधितांना तेथून दुसऱ्या सुरक्षित जागी नेण्यात आले.

(संपादन- विराज भागवत)

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here