वेळ पडल्यास हा विषय राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्यापर्यंत नेऊ, असेही ते म्हणाले
राजगुरूनगर, ता. ४ : खेड पंचायत समितीबाबत, खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी आघाडीधर्म, राजकारणातील नीतिनियम, महाराष्ट्राची राजकीय परंपरा सोडून घाणेरडे आणि निर्घृण राजकारण केलेले आहे. याला सत्तेचा माज आला आहे, असे म्हणावे लागेल, अशी जळजळीत टीका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी येथे केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहिते यांचा बंदोबस्त करावा, त्यांना वेसण घालावी आणि ते त्यांचे ऐकत नसतील तर शिवसेनेला मुभा द्यावी. आम्ही काय ते करू. वेळ पडल्यास हा विषय राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्यापर्यंत नेऊ, असेही ते म्हणाले.
खेड तालुक्यातील शिवसेना राष्ट्रवादी वाद राज्याच्या पातळीवर पोहोचला असून शिवसेनेचे खासदार राऊत यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह, आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘शिवसेनेने खेड पंचायत समितीचे विषय प्रतिष्ठेचा केलेला आहे. खेडचे आमदार आघाडीच्या नीतिनियमांना, माणुसकीला आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला अनुसरून वागलेले नाहीत. पंचायत समितीची इमारत इकडे किंवा तिकडे झाल्याने विशेष फरक पडणार नाही. मात्र एका स्वर्गवासी सहकारी आमदाराने मंजूर केलेली इमारत; ज्यामध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक आहे, ती आमदार होऊ देत नसतील, तर ते विरोधकांना बरोबर घेऊन काम करणार्या, शरद पवारांसारख्या महान नेत्याच्या पक्षात राजकारण करायच्या लायकीचे नाहीत’

शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पळवून देण्याची गरज नव्हती. अविश्वास ठराव मंजूर करताना जो तमाशा केला तो आघाडीच्या नीतिनियमात बसत नाही. त्यांना नीतिनियम माहित नसतील तर, त्यांचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्यापर्यंत हा विषय न्यावा लागेल. आम्हालाही माणसे फोडता येतात. पण आम्ही नियमांना बांधील आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या इतकीच आमची शरद पवारांवर श्रद्धा आहे. खेडच्या आमदारांची वागण्याची अशीच पद्धत राहिली तर राज्यात महाविकास आघाडी होवो न होवो, पुढच्या विधानसभा निवडणुकीत खेडमध्ये शिवसेनेचा उमेदवार असेल आणि सध्याचे आमदार माजी होतील याची, आम्ही व्यवस्था करू, असा इशाराच राऊत यांनी दिला.
Also Read: BMC निवडणूक पुढे ढकलणार? संजय राऊत म्हणतात…
खुनशी राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात आघाडीत सर्व काही व्यवस्थित चालू असताना, जर राष्ट्रवादीचा एखादा आमदार कुरघोडी करणार असेल,तर अजित पवार यांनी त्यांना वेसण घालावी. आम्ही संघर्ष टाळत आलो. वरच्या पातळीवर आघाडी धर्म पाळण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. खेडच्याबाबतही अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली होती. मात्र खेडच्या आमदाराचा वारू कायमच उधळलेला असतो. पण शिवसेनेनेही बांगड्या भरलेल्या नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसेना कधीही लाचारी पत्करून सत्तेत सहभागी होत नाही. ज्या वेळी शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल, त्यावेळी आम्ही बंधने झुगारून लढा देऊ. मोहिते यांनी शिवसेनेच्या वाघाच्या शेपटीवर पाय दिला आहे. मनात आणले तर खेडमध्ये काय ते दिसेल.
============
दोन पक्षांची युती किंवा आघाडी असते, तेव्हा एकमेकांची माणसे फोडून सत्ता प्राप्त करायची नाही, असा अलिखित नियम असतो. भाजपबरोबर युती असताना आम्ही तो पाळला. आघाडीमध्येही तो पाळला गेला पाहिजे. वरच्या पातळीवर आमच्या तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. नेत्यांमध्येही चांगला समन्वय आहे. अशा एखाद्या घटनेने दुधात मिठाचा खडा पाडणार नाही, असा निर्वाळा राऊत यांनी दिला.
Also Read: शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि दंड
शरद पवार हे पक्षांपलीकडचे मोठे नेते आहेत. अनेकांना त्यांच्या सल्ल्याची गरज पडते. विरोधी पक्षनेत्यांचा त्यांच्याकडे राबता वाढत असेल, तर महाराष्ट्रातील सरकार अधिक स्थिर होत असल्याचे ते चिन्ह आहे, असे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या भेटीबाबत ते म्हणाले.
===============
खासदार संजय राऊत यांनी पोलीस यंत्रणेबाबतही नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात पोलीस यंत्रणा वापरली गेली असेल, तर चिंताजनक आणि गंभीर आहे. अज्ञाताने केलेल्या कथित गोळीबाराचा संदर्भ सभापतींशी जोडून, त्यांना एखाद्या गुन्हेगारासारखा काळा बुरखा घालणे, परेडला उभे करणे अयोग्य आहे. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाने गोळीबार केला. मग त्याला अटक करताना काळा बुरखा का घातला नाही? शिवसेनेच्या सभापतींना जशी वागणूक दिली, तशी बनसोडेंना का दिली नाही? कायदा सर्वांसाठी सारखा आहे. या विषयाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.
Esakal