पुणे – कोरोनाच्या (Corona) लॉकडॉउनमुळे (Lockdown) तब्बल २२०० बस गेल्या दोन महिन्यांपासून जागेवरच उभ्या असल्या तरीही पीएमपीला (PMP) दरमहा तब्बल सुमारे ४० कोटी रुपये खर्च (Expenditure) करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक सुरू कधी होणार, याकडे पीएमपी प्रशासनाचे लक्ष लागले आहे. (PMP Lockdown Costs Rs 40 Crore Per Month)

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दोन्ही शहरांत मिळून पीएमपीच्या १२६ बस सुरू आहेत. मात्र, उर्वरित सुमारे २२०० बस जागेवरच उभ्या आहेत. या बसची बॅटरी खराब होऊ नये, यासाठी त्यांची रोज देखभाल दुरुस्ती करावी लागते. तसेच बस मागे-पुढेही कराव्या लागत आहेत. बसची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सुपरवायझर, मॅकेनिक, क्लीनर आदी पदांवरील ५०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच १२६ बससाठी सुमारे ३०० वाहक-चालक कार्यरत आहेत. बसमधील सीट, सिट कव्हर, हॅण्डल आदींची कामे करण्यात येत आहेत.

त्यासाठी १३ आगारांतील कार्यशाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. खर्चात बचत करण्यासाठी बीआरटी मार्गांसाठी नेमलेल्या खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती रद्द केली आहे. पीएमपीमध्ये सुमारे १० हजार कर्मचारी आहेत. त्यांचा वेतनावरील खर्च हा सर्वाधिक आहे.

प्रवासी वाहतूक बंद असली तरी, बसगाड्यांची देखभाल दुरुस्ती करणे क्रमप्राप्त ठरते. तसेच, सुरू असलेल्या बससाठी इंधन लागतेच. या काळात बसची अनेक प्रकारची कामे करावी लागत आहेत, त्यासाठी मनुष्यबळही लागते. शक्य त्या ठिकाणी खर्चात कपात करण्यात येत आहे. मात्र, काही खर्च अनिवार्य आहेत.

– सुनील बुरसे, मुख्य अभियंता, पीएमपी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here