गडचिरोली : सुरजागड प्रकल्पातील (surjagad iron project gadchiroli) उत्खननाच्या कामाला नक्षलवाद्यांनी (Maoist) पुन्हा तीव्र विरोध केला आहे. येथे उत्खननाचे काम कराल, तर जीव घेऊ, असा इशारादेखील नक्षलवाद्यांनी येथील मजुरांना एका पत्रकाद्वारे दिला आहे. (maoist threaten to people who work on surjagad iron project in gadchiroli)

Also Read: राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया; मध्यरात्री नवे आदेश जारी

गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित व तेवढ्याच वादग्रस्त सुरजागड लोहखनिज प्रकल्पाचे उत्खननाचे काम मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू झाले. मात्र, नक्षलवाद्यांचा या प्रकल्पाला विरोध दिसून येत आहे. अशातच सुरजागड लोहखनिज पहाडाच्या परिसरात नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आल्याने पुन्हा परिसरात खळबळ उडाली आहे. या पत्रकात लोहखनिजाचे उत्खनन करणाऱ्या कंपनीला मदत करणाऱ्या लोकांना नक्षलवाद्यांनी पत्रकातून सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात येथे काम करणारे व या प्रकल्पाला मदत करणारे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर येण्याची चिन्हे आहेत. लॉयड मेटल्स कंपनीच्या नावे या प्रकल्पासाठी लीज मंजूर असून येथील लोहखनिज उत्खननाला ग्रामसभा व नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून हे काम बंद होते. पण, लॉयड मेटल्स कंपनीकडून पुढील उत्खननाचे काम तामिळनाडूतील सेलम येथील त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा. लि. कंपनीला मिळाले असून हे काम पुन्हा सुरू झाले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा नक्षलवाद्यांनी या प्रकल्पाला विरोध करताना येथे ८३ वाहनांची जाळपोळ केली होती. नक्षलवाद्यांनी टाकलेले पत्रक हिंदी भाषेत आहे. ‘गुरूपल्ली, एटापल्ली, पंधेवाही, जीवनगट्टा कुणबेके भाईयो सुरजागड पहाडीपर काम को जाना जल्द से जल्द बंद करो, न की मौत का हिस्सा बनो, दुबारा संदेश नही दिया जाएगा. भाकपा माओवादी भामरागड एरिया कमेटी’, असा मजकूर नमूद आहे.

माओवाद्यांनी लिहिलेलं पत्रक

फायद्यापेक्षा नुकसान अधिक

सुरजागड प्रकल्पामुळे जिल्ह्याला फायद्यापेक्षा नुकसानच अधिक सोसावे लागले आहे. या पहाडावरील लोहखनिजावर प्रक्रिया उद्योग कोनसरी येथे उभारण्याचे स्वप्न दाखविण्यात आले. येथील लोहखनिज सर्रास इतर जिल्ह्यात नेण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरातील मजुरांच्या हातावर मजुरीचे चार पैसे ठेवून कोट्यवधींचा मौल्यवान लोहखनिज साठा लुटण्यात येत असल्याची टीका स्थानिक नागरिक, ग्रामसभांद्वारे होत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here