अकोला ः शेतात रासायनिक खताचा अजीबात उपयोग करत नाही आणि दरवर्षी शाश्‍वत व भरघोस पीक उत्पादनातून लाखोचे उत्पन्न मिळवतो, असे कोण सांगत असेल तर, कदाचित आपला विश्‍वास बसणार नाही. परंतु, गेल्या ३० वर्षांपासून म्हैसांग येथील शेतकरी हेमंतराव देशमुख यांनी ही किमया करून दाखविली असून, ५० देशी गाईंच्या संगोपनातून व त्यांच्या गोमूत्र, शेणखताच्या उपयोगितेतून ते दरवर्षी १०० एक्करातून लाखोचे उत्पन्न घेत आहेत. (Production of lakhs from a hundred acres of farmland from cow dung in Akola)

लोकसंख्या वाढीसोबतच अन्नधान्याची मागणी सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी पीक उत्पादन वाढविणे सुद्धा महत्त्वाचे आहे. पीक उत्पादन वाढवायचे म्हटले तर, रासायनिक खतांचा भडीमार, ही संकल्पना आता रूढ झाली आहे आणि त्यातूनच जिल्ह्यासह देशभरात शेतामध्ये आवश्‍यकतेपेक्षाही अधिक प्रमाणात रासायनिक खतांचा उपयोग केला जातो. रासायनिक खतांच्या अशा उपयोगितेतून मोठ्या प्रमाणात शेतीचा लागवड खर्च वाढत आहे आणि दुसरीकडे पोषक अन्नधान्य निर्मिती सुद्धा अशक्य होत आहे.

Also Read: शिक्का मारणारे कृषी सेवा केंद्र संचालक ‘हाजीर हो’!

परंतु, या दोन्ही बाबींवर मात केली आहे अकोला तालुक्यातील म्हैसांगचे अभ्यासू व प्रयोगशिल शेतकरी हेमंतराव देशमुख यांनी आणि ही किमया त्यांनी देशी गायींच्या संगोपनातून केल्याचे ते सांगतात. आजोबा-पंजोबांपासून त्यांच्याकडे केवळ शेतीसाठी गाईंचे संगोपन केले जाते. कधी काळी त्यांचेकडे २०० हून अधिक गायींचे संगोपन व्हायचे. आताही त्यांचेकडे ५० हून अधिक देशी गाई असून, त्यांच्या संगोपनातून केवळ गोमूत्र व शेणखत ते घेत असतात. कालवडी, वासरांचे योग्य पोषण होऊन चांगले गोधन तयार व्हावे यासाठी ते या गाईंचे दूध सुद्धा काढत नाहीत. त्यांच्या राहत्या घरात त्यांनी या गाईंचे संगोपन केले असून, त्यामुळे अंगणात, घरात सदैव प्रसन्नता लाभत असल्याचे ते सांगतात.

Also Read: बापरे! चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंटवरून पैशांची मागणी?

गोमूत्र, शेणखताचा उपयोग
म्हैसाग म्हणजेच खारपान पट्ट्याचा भाग. या भागात हेंमतराव देशमुख यांची १०० एक्कर शेती असून, त्यावर दरवर्षी ते लाखोचे सोयाबीन, तूर, हरभरा उत्पादन घेत असतात. गेल्या ३० वर्षांपासून ते या शेतात रासायनिक खतांचा उपयोग करीत नसून, शेणखताचा योग्य व मापक वापरातून अपेक्षेपेक्षाही अधिक पीक उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात. प्रत्येक फवारणीत ते गोमूत्राचा उपयोग करतात आणि त्यामुळे कीड नियंत्रण, तण नियंत्रण होऊन भरघोस व खात्रीचे पीक उत्पादन ते घेतात.

Also Read: चला, येत्या पावसाळ्यात करू ऑक्सिजनची लागवड!

शेणखताच्या वापरातून सव्वा दोन लाखाची बचत
शंभर एक्कर शेतीसाठी १०० पोते डीएपी, १०० पोते युरिया, १०० पोते सूपर फॉस्फेट म्हणजे जवळपास सव्वा दोन लाख रुपयांचा रासायनिक खतावर खर्च येऊ शकतो. परंतु, दरवर्षी ५० गायींपासून ५० ते ५५ ट्रॉली शेणखत प्राप्त होत असून, या खताच्या वापरामुळे रासायनिक खतावरचा संपूर्ण खर्च म्हणजे जवळपास सव्वा दोन लाख रुपायांची बचत होत असल्याचे हेमंतराव देशमुख सांगतात.

माझ्याकडे ५० हून अधिक देशी गाई असून, केवळ शेतीसाठी त्यांचे संगोपन केले आहे. अंगणात गाई असल्यामुळे सदैव प्रसन्नता लाभते तर, त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणखत, गोमूत्राच्या उपयोगितेतून लाखोचे पीक उत्पादन मिळते. गोमूत्र, शेणखताच्या वापरासोबतच शेतात योग्य पद्धतीने यांत्रीकिकरण, आर्थिक नियोजन आणि अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आम्ही करतो. त्यामुळे मजूर, तणनियंत्रण, रासायनिक खतावर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचतो व खऱ्या अर्थाने तोच शेतातील नफा असतो.
हेमंतराव देशमुख, शेतकरी, म्हैसांग

संपादन – विवेक मेतकर

Production of lakhs from a hundred acres of farmland from cow dung in Akola

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here