अकोला ः खरीप तोंडावर आला असून, जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा खरिपाची जोरदार तयारी सुरू केली असून, कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, अजूनपर्यंत जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या बियाणे पुरवठ्याच्या नियोजनापैकी केवळ ४० टक्के बियाणे उपलब्ध करण्यात आले असून, ६० टक्के बियाण्यांचा पुरवठा बाकी आहे. (Farmers search for kharif crop seeds in Akola district)

रोहिणी नक्षत्रामध्ये पूर्व मोसमी पावसाची हजेरी लागताच शेतकऱ्यांची खरिपाची तयारी जोर धरू लागते. शेत तयार करून शेतकरी बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी धावपळ सुरू करतात. कृषी निविष्ठांची खरेदी झाल्यानंतर पेरणीसाठी मग शेतकरी मृगाच्या पावसाची म्हणजेच मॉन्सूनची प्रतीक्षा करतात. यावर्षी एप्रिल, मे मध्ये निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ व ‘यास’ वादळांमुळे काही प्रमाणात मॉन्सूनचा प्रवास विस्कळीत झाला,

Also Read: शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

तरीसुद्धा मे च्या शेवटच्या आठवड्यात पूर्व मोसमी पावसाची काही ठिकाणी हजेरी लागली. पुढील तीन ते चार दिवस सुद्धा जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. त्यामुळे लवकरच मॉन्सूनचे आगमन होईल व पेरणी जोर धरेल या अपेक्षेतून शेतकऱ्यांनी सुद्धा बी-बियाणे, खते इत्यादी कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. मात्र, कृषी सेवा केंद्र, बियाणे विक्रेत्यांकडे अजूनही आवश्‍यक बियाणे साठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत होत आहे. कृषी विभागाच्या जिल्ह्यातील बियाणे पुरवठा नियोजनानुसार आतापर्यंत केवळ ४० टक्के म्हणजे ३० हजार ५२२ क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा वितरक व उपवितरकांकडे करण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांना बियाणे मिळविण्यासाठी अडचण येत आहे.

Also Read: शिक्का मारणारे कृषी सेवा केंद्र संचालक ‘हाजीर हो’!

महाबीजचे बियाणे मिळेना

शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये दर्जेदार बियाणे मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची उभारणी करण्यात आली असून, सर्वाधिक सोयाबीन बियाण्याचा पुरवठा महाबीजकडूनच केला जातो. यावर्षी जिल्ह्यासाठी २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याच्या पुरवठ्याचे नियोजन महाबीजने केले आहे. त्यापैकी केवळ १० हजार १०८ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या बियाण्याची सुद्धा शेतकऱ्यांना शोधाशोध करावी लागत असून, बियाणे उपलब्ध नसल्याचे बियाणे विक्रेते सांगत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत.

बीटी कापसाचे ५० टक्के बियाणे

जिल्ह्यात सोयाबीन पाठोपाठ कापूस पिकाची पेरणी केली जाते. शिवाय कपाशीची पेरणी लवकर करण्याकडे शेतकऱ्यांचा भर असतो. काही शेतकरी पूर्व मोसमी तर काही मृगाच्या पहिल्या पावसासोबत कपाशीची पेरणी करतात. मात्र, यावर्षी अजूनपर्यंत विविध कंपन्यांच्या बीटी बियाण्याचे ५० टक्के म्हणजे ७ लाख १८ हजार ९६१ पाकिटांच्या नियोजनापैकी ३ लाख ६० हजार ६४० बियाणे पाकिटांचा पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे.

३१ मे पर्यंतचा बियाणे पुरवठा

कृषी विभागाद्वारे यावर्षी जिल्ह्यात ३२ बियाणे कंपन्यांकडून ७४ हजार १०९ क्विंटल सोयाबीन, कापूस बियाण्याचे सात लाख १८ हजार ९६१ पाकिटे पुरवठ्याचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यापैकी ३१ मे पर्यंत ३० हजार ५२२ क्विंटल सोयाबीन, तीन लाख ६० हजार ६४० कपाशी बियाण्याचे पाकिटे, दोन हजार ८९१ क्विंटल तूर व ४९० क्विंटल उडीद बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे.

घरचे बियाणे वापरा

गेल्यावर्षी अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे पीक उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे नियोजनानुसार बियाणे उत्पादन होऊ शकले नाही. ही बाब लक्षात घेता व बियाण्याच्या तुटवड्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना घरचे बियाणे पेरण्याचा सल्ला सुद्धा कृषी विभागाकडून वेळोवेळी दिला जात आहे.

संपादन – विवेक मेतकर

Farmers search for kharif crop seeds in Akola district

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here