फुलराणी काय करणार? लंडन ऑलिंपिकमध्ये साईना नेहवालनं ब्राँझ पदक जिंकल्यानंतर रिओ ऑलिंपिक काही दिवसांवर आल्यावर हा प्रश्न विचारला जात होता. पी. व्ही. सिंधू रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यापूर्वी, त्यानंतर तीन वर्षांनी जागतिक विजेतेपद जिंकत असताना साईना हीच भारतीय बॅडमिंटनचा चेहरा होती. किदाबी श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं, त्यानंतरही प्रकाशझोतात श्रीकांतपेक्षा साईनाच जास्त होती.

साईनाचं टोकिओ ऑलिंपिक हुकणं हे भारतीय क्रीडाचाहत्यांसाठी धक्कादायक असेल; पण भारतीय बॅडमिंटनच्या अभ्यासकांना मात्र त्याचं आश्चर्य वाटणार नाही. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वी साईनाची खालावलेली कामगिरी पाहून अभ्यासकांनी हे काहीसं अपेक्षिलेलंच होतं. सन २०१९ च्या ‘इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धे’त साईनाविरुद्धची अंतिम लढत खेळत असताना कॅरोलिन मरीन जखमी झाली होती. त्यामुळे साईनानं विजेतेपद जिंकलं. त्यानंतर तिनं एकही स्पर्धा जिंकली नाही. आता साईना ऑलिंपिकसाठी पात्र ठरत नसताना कॅरोलिन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेली आहे, हा एक योगायोगच म्हणायला हवा.

साईनाचं २०१९ पासूनचं, नेमकं सांगायचं झालं तर, ऑलिंपिक पात्रतास्पर्धा सुरू झाल्यापासूनचं अपयश खुपणारं आहे. सातत्यानं होणाऱ्या दुखापतींमुळे ती बहरात आलीच नाही. रॅली सुरू असताना ती थकत होती. ऑलिंपिक पात्रतास्पर्धेतील सुरुवातीच्या अपयशामुळे ती माफक स्पर्धाही सोडण्यास तयार नव्हती. त्यामुळे ती थकत गेली. २०१९ मध्ये मे ते ऑक्टोबर या सहा महिन्यांत ती दहा स्पर्धा खेळली. या अपयशामुळे कोरोना महामारीचा ब्रेक तिचं दडपण वाढवतच गेला. आघाडीच्या १६ खेळाडूंपासून आपण सहा ते आठ क्रमांकांनी दूर आहोत हे तिला सतावत होतं. वय झालं होतं; पण आवडता खेळाडू रॉजर फेडररपासून ती प्रेरणा घेत होती.

गेल्या काही वर्षांत साईनात बदल होत गेला. ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील यशापेक्षा सिंधूवरील विजयामुळे ती जास्त खूश होते का,’ अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. ‘स्टार वॉर’साठी आसुसलेल्यांना ही आयतीच संधी होती. साईना पराजित होत असतानाही एखादा गुण जिंकल्यावर तिच्या चेहऱ्यावर दिसणारं स्मितहास्य लुप्त होऊ लागलं.

आता काय?

कदाचित साईना अजूनही खेळत राहील. भारतात तिच्या राष्ट्रीय वर्चस्वाला सध्या तरी आव्हान दिसत नाही. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा दीडेक वर्षावर आहेत. त्यातील यश तिला खुणावत असेल. कदाचित ऑलिंपिकनंतरच्या जागतिक स्पर्धेतही ती जास्त जिद्दीनं सहभागी होईल; पण या जिद्दीला आता शरीर आणि त्यापेक्षाही खेळ साथ देणार का हा प्रश्न आहे.

‘फुलराणी’ची घसरण

  • पात्रता स्पर्धेतील दहा फेऱ्यांत सलामीला हार

  • दुसऱ्या, तसंच तिसऱ्या फेरीत प्रत्येकी एकदा हार

  • दोन स्पर्धांत उपांत्यपूर्व फेरीत पराजित

  • सर्वोत्तम कामगिरी ‘ऑर्लेन्स मास्टर्स’ची उपांत्य फेरी

  • अखेरचं विजेतेपद २०१९ मध्ये इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत

  • कारकीर्दीत एकेरीत ६४० पैकी ४४० सामन्यांत विजयी; पण यंदा नऊपैकी चारच सामन्यांत विजयी.

  • साईना पात्रतेच्या सतरा स्पर्धा खेळली, तर पात्रतेत अव्वल आलेली चेन यू फेई १५ आणि तई झू यिंग १२, चौथी असलेली कॅरोलिन मरीन १५ स्पर्धा खेळली.

  • साईनापेक्षा जास्त स्पर्धा खेळून पात्रता मिळवणाऱ्यांत अकेन यामागुची (१८), बुसानन आँगबामुंगफान, ॲन सेऊयंग, किम गाएऊन (प्रत्येकी २२), हे बिंग जिओ मिशेल ली (प्रत्येकी १९) यांचा समावेश.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here