आज शिवराज्याभिषेक दिन. सुमारे चारशे वर्षांपूर्वी झालेल्या या राज्याभिषेकाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गारुड आजही कसे काय? हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांची महती समजून घेण्याच्या प्रवासातला महत्त्वाचा प्रश्न ठरतो. तसे तर इतिहासात अनेक राजे-रजवाडे होऊन गेले. मात्र, सगळ्यांचीच आठवण आपण काढत बसत नाही. त्यांचा राज्याभिषेक सोडा, त्यांची जयंती देखील आपल्या लक्षात नसते. मात्र, शिवाजी महाराज यांच्यात असं काय वेगळेपण होतं ज्यामुळे आजही अगदी गल्लीतल्या लहान मुलांनाही ‘जय शिवाजी’ घोषणा प्रेरणा देते? या नावात हे बळ आलं तरी कुठून?
‘स्वराज्यसंस्थापक’ शिवाजी महाराज
पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज हे काही आयत्या राज्याच्या गादीवर येऊन बसलेला राजा नव्हता. शिवरायांचं राज्य हे वारसा हक्काने मिळालेली जहागिर नव्हती तर त्यांनी ते राज्य स्वत:च निर्माण केलं होतं, स्थापन केलं होतं. मात्र, तरीही शिवाजी महाराजांचं राज्य ‘रयतेचं’ का ठरलं आणि आजही त्याबद्दल कुतूहल, आदर, गर्व, भक्ती आणि आपुलकीची भावना का आहे, या प्रश्नाचं उत्तर यातून मिळत नाही. त्यासाठी आपल्याला अधिक खोलात जावं लागतं.

राजांचंच राज्य लोकप्रिय का ठरलं?
ढोबळमानाने शिवाजी महाराज म्हटलं की, अफझलखानाचा कोथळा, शाहिस्तेखानाची बोटं आणि आग्र्याची सुटका इथंवरच आपण शिवरायांचं कर्तृत्व बोथट करुन ठेवतो. ‘तोरणा किल्ल्यापलिकडे’ जाऊन ‘शिवरायांच्या धोरणांवर’ बोलण्याचे कष्ट आपण घेत नाही. मात्र खरी मेख त्याठिकाणीच आहे. याबाबत विचारवंत नरहर कुरुंदकर म्हणतात की, “समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. मात्र, अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.”
तुमच्या माझ्यासारख्या सामान्य घरातून आलेला शिवबा राज्यनिर्माता कसा झाला? आणि त्याचं राज्य लोकप्रिय कसं ठरलं? या प्रश्नांचा शोध घेणं यासाठीच महत्त्वाचं वाटतं. शिवरायांप्रमाणेच इतिहासात अनेक राजांनी राज्य निर्माण केलं होतं मात्र फक्त शिवाजी महाराजांचंच राज्य लोकप्रिय ठरलं याचं प्रमुख कारण आहे, की त्यांच्या प्रजेला ते राज्य आपलं आहे, माझं आहे, असं वाटलं. हे शिवाजी महाराजांचं राज्य आपलं आहे आणि त्यासाठी काहीही करण्याची भावना प्रजेमध्ये असणं, हेच शिवाजी महाराजांच्या लोकप्रिय राज्यामागचं मुख्य कारण होतं.
शिवरायाचंच राज्य लोकांना ‘आपलं’ का वाटलं?
मात्र, मग प्रश्न असा पडतो की, शिवाजी महाराजांचं हे राज्य लोकांना ‘आपलं’ का वाटत होतं? असं काय वेगळेपण राजांच्या नेतृत्वामध्ये होतं? याचा आपल्याला जर शोध घ्यायचा असेल तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाचा अधिक शोध घ्यावा लागतो. दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या सोयीचा ‘शिवबा’ आहे. जो तो आपापल्या पद्धतीने महाराजांना मांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बहुसंख्य मराठी जनतेला महाराजांचं राज्य आपलं का वाटलं, याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्या शिवरायांनी दिलेल्या आज्ञा उपयोगी पडू शकतात. त्या-त्या परिस्थितीत जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि आज्ञापत्रात दिलेल्या आज्ञांवरुन आपल्याला त्यांचा राज्यकारभार समजून घेता येऊ शकतो. शिवाजी महाराजांनी लिहलेली काही पत्रे आजही उपलब्ध आहेत. त्यात शिवाजी महाराज जनतेविषयी काय विचार करतात, यावरुन आपल्याला याचा शोध घेता येईल.

शिवरायांच्या आज्ञापत्रातील या आज्ञा आपण वाचल्याच पाहिजेत…
-
‘राज्यातील प्रजा तोच राज्याचा जीवनोपाय आहे’.
– इथे महाराज प्रजेला राज्याचा मूळ कणा मानताना स्पष्टपणे दिसून येतात.
-
‘सिपाही ही अगर पावखलक हो, गाव राहिले असाल त्याणी रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. साहेबी खजानांतून वाटणिया पदरी घातलिया आहे ती ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेढोरे वागवीत असाल त्यास गवत हो, अगर फाटे भाजीपाले व वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावे, कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही.’
– या आज्ञेवरुन थेट लक्षात येतं की, आपल्या सरदारांनी प्रजेवर कसल्याही प्रकारचा जुलूम अथवा अन्याय करण्याची मुभा महाराज देत नाहीत.
-
‘हाली उनाळ्याला आहे तइसे खलफ पागेचे आहेत, खण भरून राहिले असतील व राहातील. कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागी चुली रधनाळा करतील, कोण्ही तंबाकूला आगी घेतील, गवत पडिले आहे, ऐसे अगर वारे लागले आहे, ऐसे मनास ना आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळोन जातील. गवताच्या लहाळ्यांस कोणीकडून तरी विस्तो जावून पडला म्हणजे सारे गवत व लहळ्या आहेत तितक्या एकेएक जाळो जातील.’
– शिवरायांच्या या आज्ञेवरुन स्पष्ट दिसून येतं की, महाराज अगदी उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये नजरचुकीने गवताच्या गंजीला आग लागून अधिक नुकसान होऊ नये, यासाठी किती बारकाईमध्ये सैन्याला सुचना देत आहेत.

-
‘बलात्कार (रयतेवरी) सर्वथैव न करावा.’
– राजांनी आपल्या राज्यातील स्त्रियांच्या संरक्षणाला आणि सन्मानाला उचित स्थान दिलं होतं.
-
‘राजा कालस्य कारणं’ याकरितां राजेलोकीं बहुत सगुण असावें लागर्ते. स्वामी धाकुटपणापासून या देशात आहेत. मिरासदार कोण गैरमिरासदार कोण हे जाणताती व माणसाचे माणूस वळखतात.’
– यामध्ये शिवाजी महाराज राजा कसा असावा, याचेच वर्णन करतात.
-
‘अंध, पंगु, आतुर, अनाथ, अनुत्पुन्न जे असतील त्यांचे ठायीं भूतदया धरून जे जिवंत असती जों, तो त्यांचा जीवनोपाय करून देऊन चालवीत जावें.’
-
‘गरीब अनाथ ते मुंग्या चिलटासारखे आहेत. त्यास उपसर्ग करण्यात काही मोठेपणा नाही.’
– अंध, अपंग, अनाथ आणि गरीब लोकांविषयीची राजांची कणव यातून दिसून येते.
-
‘शासनायोग्य अन्याय केल्यास तेच क्षणीं यथायोग्य शासन करावें. भीड करूं नये.’
– राज्याच्या दृष्टीने शासन मोडल्यास त्याला शिक्षा करताना हयगय बाळगू नका, अशीही ठाम सुचना राजे देतात.

-
‘स्वराज्यातील आंबे, फणस आदि करून हेही लांकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यांस हांत लावू देऊ नये. काय म्हणोन, कीं ह्रीं झाडें वर्षां दोन वर्षांनी होतात असे नाही. रयतांनी हीं झाडे लावून लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविलीं. ती झार्डे तोडिल्यावर त्यांचे दुःखास पारावार काय? .याकरितां हे गोष्टी सर्वथैव होऊं न द्यावी.’
-
‘गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्यें एक काठीही तोर्डो न द्यावी.’
– आपल्या राज्यातील झाडांचीही काळजी घेणारा हा राजा माणसांच्यात लोकप्रिय झाला नसता तर नवलच!
-
‘जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्ताल तोपर्यंत आम्हीही तुम्हासी इमाने वर्तो, तुम्हापासून इमानात अंतर पडलिया आमचाही इमान नाही.’ (निलकंठरावांना लिहिलेले पत्र ९ ऑगस्ट, १६५४)
– आपल्या राज्यासाठी प्रसंगी शत्रुत्व पत्करायची तयारी राजे दाखवत असत.

-
‘महसूल न्यून होणे हीच राज्याची जीर्णता, तोच राज्य लक्ष्मीचा पराभव.’
– राज्य चालवायला महसूल लागतो. तो कमी होणं म्हणजे राज्यच रसातळाला जाणं होय, हे राजे जाणून होते.
-
‘कार्यभागी बुध्दिमंत असतील त्यांस पुसावें. ज्याची जी अधिक युक्ति असेल ती घेऊन जेणेंकरून योजिलें कार्य सिध्दीस जाय तें करावें.’
– शिवाजी महाराज बुद्धीमंतांचा आदर करत असत आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याला अधिक महत्त्व द्या, असंही ते म्हणताना दिसतात.
-
‘राजमंदिरास भिंती इटांच्या बांधून त्यास चुना दाट गच्च घालावा. घरांत कोठे उंदीर, विंचू किडा, मुंगी राही अशी दरद न ठेवावी.’
– शिवाजी महाराज किती खोलात जाऊन विचार करत असत, याचं हे उदाहरण…
-
‘गडावरी झराही आहे, जसें तर्से पाणीही पुरतें, म्हणून तितक्यावरीच निश्चिंती न मानावी. किंनिमित्य कीं झुंजांमध्ये भांडियांचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते याकरितां तसे जागीं जखिरियाचे पाणी म्हणून दोन चार टाकीं तळी बांधावी. त्यातील पाणी खर्च होऊ न द्यावें, गडाचे पाणी बहुत जतन राखावें.’
– गडावरील पाण्याचा वापर कसा काटकसरीने केला पाहिजे, याची आज्ञा शिवराय देताना दिसतात.
संदर्भ :
-
शिवरायांचा आठवावा साक्षेप – संजय रेंदाळकर – राष्ट्र सेवा दल प्रकाशन
-
शिवाजी कोण होता? – गोविंद पानसरे – लोकवांगमयगृह प्रकाशन
-
छत्रपती शिवाजी महाराज जीवन – रहस्य – नरहर कुरुंदकर – देशमुख अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.
Esakal