-
भाजपच्या प्रवीण दरेकर यांचा आदित्य ठाकरेंना टोला
मुंबई: जागतिक पर्यावरण दिनी वर्तमानपत्रात पानभर जाहिरात देणाऱ्या पर्यावरणमत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी (Worli) मतदारसंघात, ती जाहिरात शिळी होण्यापूर्वीच 40 झाडे तोडण्यात (Tree Cutting) आली, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी लगावला. संबंधितांना वृक्षशत्रू अशी उपमा देताना हा तर कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार असल्याची टीकाही दरेकर यांनी केली. (BJP Pravin Darekar slams Aaditya Thackeray over Tree Cutting incidence in Worli Mumbai)
Also Read: “जसे मुंबईत बाळासाहेब ठाकरे, तसेच नवी मुंबईत दि. बा. पाटील”
झाडांमुळे जाहिरातीचे होर्डिंग झाकले जाऊन होर्डिंग दिसत नाहीत म्हणून झाडे तोडण्यात आल्याची स्थानिकांची तक्रार आहे. तसे असेल तर हे अधिकच निषेधार्ह आहे. झाडे तोडण्यासाठी कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांचेच सांगणे आहे. असे असेल तर हे कायद्याचे राज्य आहे का, अशी खरमरीत टीकाही दरेकर यांनी केली.
Also Read: “सरकारने अशा घुबडांची काळजी न करता…”; संजय राऊतांचा संताप

एकीकडे पर्यावरण दिन उत्साहात साजरा होत असताना आणि वसुंधरा दिनाचा मोठा कार्यक्रम पर्यावरण विभागाकडून होत असताना हा प्रकार घडला. मुंबई महानगर पालिका आणि पर्यावरण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच वृक्षांची खुलेआम कत्तल करण्याची हिंमत वृक्षशत्रू दाखवू शकले, अशी टीकाही दरेकर यांनी केली. काल वरळीत 40 वृक्ष तोडण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यासंदर्भात दरेकर यांनी आज भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासमोबत या जागेची पहाणी केली.
Also Read: लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोविड संसर्गाचा धोका कमी!
झाडांच्या कत्तलीचे सीसीटीव्ही फूटेज आणि व्हिडियो देखील उपलब्ध असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे याप्रकरणी दोषी असलेल्या वृक्ष प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करा. एरवी पावसापूर्वी झाडांच्या छाटणीसाठी सोसायट्या महापालिकेकडे अर्ज करतात तेव्हा महापालिकेला वेळ नसतो. आणि आता ही खुलेआम झाडांची कत्तल झाली याचा अर्थ महापालिकेच्या कायद्यांची कोणालाही भीती राहिली नाही, असेही दरेकर यांनी दाखवून दिले.

Also Read: Corona Update: मुंबईत रुग्णवाढीचा दर 0.13 टक्क्यांवर
आम्ही कोणतीही मागणी वैयक्तिक द्वेषातून करीत नाही. हा पर्यावरण मंत्र्यांचा मतदारसंघ आहे आणि तिथेच अशा घटना घडत असतील, कुंपणचं शेत खायला लागले तर शेवटी लोकांनी कुणाकडुन अपेक्षा धरायची, हा प्रश्न आहे. एक झाड जगवायला सात आठ वर्षांचा काळ लागतो. एका बाजूला ऑक्सिजनची कमतरता आहे, अधिकाधिक वृक्ष लावण्यासाठी सरकार पैसे खर्च करते, सामान्य नागरिकही सहभाग देतात आणि दुसऱ्या बाजूला खुलेआम कत्तल होत असेल तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
Also Read: विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव द्यावे- रामदास आठवले
Esakal