नवी दिल्ली – क्रिकेट कारकिर्दीच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये 7 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजावर दुसऱ्या सामन्याआधी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिला सामना खेळल्यानंतर दुसऱ्या सामन्याआधी इंग्लंडचा गोलंदाज ओली रॉबिन्सन याला दुसऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आले. यामागचे कारण सोशल मीडिया असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे 7 ते 8 वर्षांपूर्वी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमुळे ओली अडचणीत आला आहे.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने चौकशी पूर्ण होईपर्यंत ओलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निलंबित केलं आहे. आता गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एजबेस्टनमधील दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याला खेळता येणार नाही. बोर्डाने याबाबतची माहिती दिली असून, रॉबिन्सन इंग्लंडचा कँप सोडून त्याच्या काउंटी क्लब ससेक्सला परतणार आहे.
Also Read: ‘जडेजाची कॉपी करा’; पीटरसनचा इंग्लंडच्या युवा खेळाडूंना सल्ला

रॉबिन्सनने आपण सोशल मीडियावर वर्णभेद आणि लिंगभेदावरून कमेंट केली होती आणि त्याबाबत माफीही मागितल्याचं मान्य केलं आहे. रॉबिन्सनने पहिल्या कसोटी सामन्यासाठी मैदानात पाऊल टाकताच सोशल मीडियावर त्याचं जुनं ट्विट व्हायरल झालं. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी करत 7 गडी बाद केले. पहिल्या डावात 75 धावात 4 तर दुसऱ्या डावात 26 धावांवर 3 जणांना बाद केलं. त्याशिवाय इंग्लंडकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना 42 धावाही केल्या.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटने म्हटलं की, मैदानावर कामगिरी पाहिली तर त्याचं पदार्पण खास असं ठरलं. मात्र मैदानाबाहेर जे काही केलं त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रॉबिन्सनने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये तो यशस्वी होऊ शकतो. मात्र मैदानाबाहेर घडणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर खेळात हे कधीच स्वीकारलं जाणार नाही असंही रूटने म्हटलं.
Esakal