आजही एक किंवा जास्तीजास्त दोन मुलांपेक्षा अधिक मुले होऊ नयेत, याची चीनी माणूस काळजी घेतो. लग्न झाल्यानंतर दीर्घकाळ मूल होऊ नये, याचे प्रयत्न अनेक कुटंबे करतात.

गेल्या आठवड्यात चीनमध्ये दोन महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. पहिली घोषणा चीनी कुटुंबाला तीन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी व दुसरी, चीन हा एक प्रेमळ देश आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी जगातील माध्यमांशी संपर्क, संवाद साधण्याची गरज असल्याचे खुद्द अध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलेले आवाहन. माओंच्या काळात चीनी कुटुंबाला एकापेक्षा अधिक मूल असण्यावर कठोर बंधने होती. ते धोरण चीनने 1979 पर्यंत चालविले. मुलगी झाली, तर भारतात जसे मोठा भार पडणार, असे समजले जाते, तसे चीनमध्ये मुलगी जन्मली, तर तिला जन्मताच जिवे मारले जात असे. परंतु, जसजसे चीनची लोकसंख्या वृद्ध होऊ लागली व शेती, कारखाने, अऩ्य व्यवसाय यामध्ये काम करणाऱ्या तरुण-तरूणींची संख्या कमी होऊ लागली, तसे चीनच्या राज्यकर्त्यांनी कुटुंब वाढीस म्हणजे एका ऐवजी दोन मुलांना जन्म देण्यास परवानगी दिली. गेल्या आठवड्यात तीन मुलांचे धोरण जाहीर करण्यात आले.

पक्षाच्या पॉलिटब्यूरोने 31 मे रोजी म्हटले, की 11 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिरगणतीनुसार, 2020 मध्ये फक्त 12 दशलक्ष मुले जन्मली. हे प्रमाण 1961 च्या मानाने सर्वाधिक घट झाल्याचे दर्शविते. चीनमध्ये साठ व त्यावरील वयोमान असलेल्यांची संख्या 264 दशलक्ष असून, हे प्रमाण 2010 पासून 5.44 टक्क्यांनी वाढले आहे. चीनच्या एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण 18.70 टक्के आहे. केवळ एक अपत्याबाबतचे धोरण अवलंबिल्याने चीनमधील जननाचे प्रमाण 1979 मधील 2.75 वरून 2018 मध्ये 1.69 इतके घसरले. परिणामतः सर्वसामान्य काळात होणारी 300 दशलक्ष मुलं जन्म घेऊ शकली नाही.

Also Read: वुहानच्या लॅबमधूनच कोरोना लीक – अमेरिकेचा दावा

2013 मध्ये चीनने दुसरे मूल होण्याची परवानगी दिली. त्यानंतर 2015 ते 2019 दरम्यान मी चार वेळा चीनला भेट दिली. त्यात शांघाय, बीजिंग, ग्वांगझाव, शियान या शहरांना दिलेल्या भेटीत चीनच्या लोकसंख्येच्या धोरणाबाबत काही अधिकारी, गृहिणी व सामान्य माणसांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान, भारतातील सर्वाधिक तरूण लोकसंख्येचा लाभ भारताला होत आहे, याची जाणीव त्यांना असल्याचे ध्यानात आले. चोंचिग या गावात एका महिलेला दोन अपत्यांबाबतच्या धोरणाबाबत विचारता, ती म्हणाली, की धोरण चांगले आहे, घरात एक माणूस वाढेल, असंही वाटतं. पण, त्याचबरोबर त्याचं संगोपन, शिक्षण यासाठी कराव्या लागणाऱ्या पैशाची अडचण आहे. त्यामुळे अजूनही एकच मूल असावं, असं अऩेकांना वाटतं.

चीनमध्ये लग्न झालेली मुले व आई-वडील वेगवगळे राहातात. शाळेला सुटी लागली, की मुलं काही दिवसांसाठी आजोळी जातात. हे काहीसे आपल्या समाजासारखे. एका वृद्ध कुटुंबाला भेट दिली, तेव्हा त्यांच्या घरी लहान मुलांची रणगाडे, गाड्या, ट्रक्स आदी खेळणी एका खोलीत दिसली. त्याबाबत विचारता, नातवंड यायची आहेत, म्हणून काही खेळणी आणून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. 2018 मध्ये भेटलेला गाईड ली शूयांग भावंडांपैकी सर्वात मोठा. 1976 पूर्वीचे दिवस होते. तो म्हणाला, आम्ही लहान होतो. एके दिवशी आईने एक पेटी आणली. त्यात काय आहे, असं विचारता, मांजर आहे, असं तिनं सांगितलं. पाहायची म्हणून आम्ही हट्ट धरला, पण तिनं पेटीत काय आहे, हे दाखवलं नाही. उलट, दुसऱ्या दिवशी ती पेटी गायब झालेली होती. पुन्हा तिनं विषयही काढला नाही. अलीकडे आम्हा दोन भावंडांना समजलं, की आम्हाला आणखी एक बहीणही आहे. मांजर सांगून तिलाच आईनं नातेवाईकाकडे दिलं होतं. आई, वडील वा आम्हा कुणालीही ती ओळखत नाही. माझ्या आईनं तिला, नातेवाईकाला संभाळण्यास दिली होती, तेव्हा पासून ती त्यांच्याचकडे वाढली. कारण, मुलांविषयी त्या काळातलं सरकारचं धोरण कठोर होतं. तिसरं मूल झालय, हे तिनं अनेक वर्षे लपवून ठेवलं. आजही एक किंवा जास्तीजास्त दोन मुलांपेक्षा अधिक मुले होऊ नयेत, याची चीनी माणूस काळजी घेतो. लग्न झाल्यानंतर दीर्घकाळ मूल होऊ नये, याचे प्रयत्न अनेक कुटंबे करतात. बव्हंशी कुटुंबांना वाढती जबाबदारी नको असते.

Also Read: हद्दच झाली! किती रुग्णांचा मृत्यू होतो पाहण्यासाठी ऑक्सिजन केला बंद

सारांश, चीनने लोकसंख्येबाबतचं धोरण शिथील केलं असलं, तरी ते प्रत्यक्षात उतरण्यात अऩेक अडचणी आहेत. चीनमध्ये सरकार अऩेकदा सांकेतिक भाषेतून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. उदा. गेल्या वर्षी सरकारनं एक डाक तिकिट जारी केलं. त्यावर डुकरांचं एक दांपत्य व त्यांची तीन गोजिरवाणी पिलं, असं चित्र आहे. 2019 हे चीनमध्ये इयर ऑफ पिग होत. जनतेचं मन वळविण्याचा तो प्रयत्न होता. झपाट्याने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी कामगार वर्ग आणायचा कोठून हा चीनपुढे यक्षप्रश्न आहे. असाच प्रश्न वृदधापकाळाकडे झुकणाऱ्या जपान व युरोपातील अनेक देशांपुढे आहे. तेथेही एकीकडे जन्माचे प्रमाण घटतेय व वृद्धांचे प्रमाण वाढते आहे.

दुसरी घोषणा चीन हा एक प्रेमळ देश आहे, अशी प्रतिमा जगात निर्माण करण्याचे शी जिनपिंग यांचे आवाहन. अध्यक्षांना याची गरज भासावी, याचाच अर्थ चीन एक अहंकारी, उर्मट देश आहे, अशी गेल्या काही वर्षात निर्माण झालेली प्रतिमा होय. जिनपिंग यांनाही हे मान्य असावे. जगातील माध्यमातून चीनची प्रतिमा प्रेमळ देश म्हणून बनवायची असेल, तर त्यासाठी चीनला तिबेट व शिंजियांगमधील उइघूर लोकसंख्येला प्रेमाने वागवावे लागेल, हाँगकाँगला अधिक स्वायत्तता द्यावी लागेल. मानवाधिकारांचा आदर करावा लागेल. चीनला अधिक पारदर्शी बनवावे लागेल. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तसे केले, तर चीनची आक्रमक व उद्धट प्रतिमा काही प्रमाणात घटेल.

Also Read: World Ocean Day – समुद्राच्या स्वच्छतेवर अवलंबून पृथ्वीचं आरोग्य

चीनचे प्रतिमावर्धन करण्यासाठी चीनने जगात शेकडो कॉन्फ्युशियस (चीनचा तत्ववेत्ता) सेंटर्स सुरू केली आहेत. तसेच, काही वर्षांपूर्वी सुरू केलेली पांडा शिष्टाई आजही चालू आहे. पांडा शिष्टाईचा अर्थ चीनमध्ये सापडणारा ब्लॅक अँड व्हाईट या अत्यंत गोजिरवाण्या प्राण्याची निरनिराळ्या देशांबरोबर होणारी देवाणघेवाण. त्यामुळे चीन हा गोजिरवाणा देश बनलाय, असे मुळीच नाही. परंतु, त्या प्राण्याबाबत निर्माण होणारे प्रेम ही चीनच्या दृष्टीने जमेची एक बाजू आहे. या प्राण्याची जगात इतकी मागणी वाढली, की आता चीन काही देशांना वार्षिक भाड्याने पांडा देत आहे. तसेच, त्यांची पैदासही वाढवित आहे.

चीन एक प्रेमळ देश आहे, अशी प्रतिमा चीनला हवी असेल, तर चीनने पाँगाँग लेक, घोग्रा खोरे, हॉटस्प्रिंगमधील सैन्य हटविले पाहिजे, दक्षिण चीन समुद्रावरील व जपाननजिक सेनकाकू बेटांवरील दावे मागे घेतले पाहिजे व सर्वात महत्वाचे म्हणजे, कोरोनाची मूळ सुरूवात वूहानच्या व्हायरॉलॉजी लॅबोरेटरीमधून कशी झाली, हे पारदर्शकपणे जगापुढे मांडले पाहिजे. हे सारे करण्यास चीन तयार असेल, तरच त्याची प्रतिमा सुधारेल, अन्यथा चीनकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन अधिक कठोर बनेल. त्या संदर्भात शी जिनपिंग येत्या काही महिन्यात कोणकोणती पावले टाकतात, ते पाहावे लागेल.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here