विनोद खरे

चिखली (जि.बुलडाणा) : स्वच्छता आणि कार्यतत्परतेचा दिंडोरा पिटणार्‍या नगरपालिकेचा भोंगळ कारभार मॉन्सूनपूर्व पावसाने शहरवासीयांसोबत आणला असून, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व्यवस्थितरीत्या न झाल्याने 7 जूनला नागरिकांना चांगलीच अडचण निर्माण झाली. बहुतेक नागरिकांच्या दुकानांसह गाळ्यामध्ये घाण पाणी शिरल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत 3 जूनलाच दैनिक सकाळ ने नगरपालिकेच्या नालेसफाई विषयी लक्ष वेधले होते. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शहरात वेगळेच चित्र निर्माण झाले. (Buldhana: In the first rain, the cleaning of the municipality was blown up)

शहरातील घनकचरा रस्त्यावर येऊन नागरिकांच्या घरात, रस्त्यांवर असलेल्या दुकानांमध्ये तसेच तळघरात असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता दैनिक सकाळ ने वर्तविली होती. मात्र, पालिकेने त्यावर कुठल्याच प्रकारची ठोस कार्यवाही केली नाही. शहरात रस्त्यांचा विकास अतिक्रमणाच्या नावाखाली पाहिजे तसा झाला नसल्याचा प्रत्यय चिखलीकरांना आला आहे.

Also Read: कॉंग्रेसमध्ये गटबाजी; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीने प्रश्न मिटेल का?

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या नाल्या पावसाचे पाणी वाहून नेण्याकरिता अपुर्‍या ठरल्या असून त्याचा धोका येणार्‍या दिवसांत नागरिकांना भेडसावत आहे. त्याच बसस्टॅण्ड लगतच्या नालीमध्ये जवळपास 3 ठिकाणांहून येणारे पाणी वळविण्यात आल्यामुळे डी.पी.रोडवरील ही नाली हे पाणी वाहून नेण्याकरिता कुचकामी ठरल्याचे पहिल्या पावसात दिसून आले आहे. भविष्यात डी.पी.रोडवरील व्यापार्‍यांच्या तळघरामधील असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Also Read: नक्षत्रावरून कसा पडतो पाऊस? मृग, मेंढा, उंदीर, म्हैस या नावांची गंमत तरी काय?

गोपाल टॉकीज समोरील शिवाजी उद्यानकडून येणार्‍या नालीचे घाण पाणी, उतारवळणावरून थेट अंबिका अर्बन समोर पसरत असून हे पाणी शेवटी शिवाजी चौकात येते. या पाण्यासह बस डेपो परिसरातून येणारे पाणी, गजानन नगरातून येणारे पाणी, बसस्टॅण्ड समोरील रस्त्यांवरून येणारे पाणी हे डी.पी.रोडवरील नाल्यांमध्ये काढल्यामुळे अगोदरच छोटी असलेल्या नालीमध्ये हे पाणी वळविण्यात आल्यामुळे डी.पी.रोडवरील नागरिकांच्या दुकानासह रस्त्यालगत असलेल्या रहिवाशांना देखील धोका निर्माण झाला आहे. शहरातील नाल्यांमधील हे घाण पाणी पुढे जाऊन जांबुवती नदीमध्ये सोडण्यात येत असल्यामुळे या नदीमधील पाणी पूर्णत: दूषित होत असून पालिकेने याबाबत पावले उचलणे आवश्यक आहे.

पालिकेच्या वतीने केवळ संत रविदास नगरमधील नाल्यांमधील साफसफाई केल्याने शहरातील सफाई होणार नाही. नाल्यांमधील घाण सफाई कर्मचारी वर काढून ठेवतात परंतु पालिकेच्या वतीने ही घाण उचलण्यात न आल्यामुळे तशीच पडून राहते व पावसाळ्यात परत नाल्यांमध्ये मिसळून मोठ्या प्रमाणावर घाण निर्माण होते. त्यामुळे वेळीच शहरातील सर्व नाल्यांमधील घाणकचर्‍याचे पूर्णत: निर्मूलन होणे आवश्यक आहे. शहरातील नाल्या साफ न केल्याने पावसाळ्यात घाण पाणी तुंबून डासांचा उपद्रव वाढून आरोग्य विषयक समस्या निर्माण होतील. कोणत्याही अस्वच्छतेमुळे नागरिकांना आरोग्याचा धोका होण्यापूर्वी नगर परिषदेने नाले सफाईसह इतर कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी शहरवासीयांमधून केली जात आहे.

Also Read: राज्यात वाढणार गायी, म्हशी, शेळ्या!

प्रभारी मुख्याधिकार्‍यांसोबत संपर्क नाही

पालिकेचे मुख्याधिकारी वैद्यकीय रजेवर असल्याने शहरातील गंभीर समस्येबाबत प्रभारी मुख्याधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अगोदरच कर्मचार्‍यांअभावी सुरू असलेल्या पालिकेमध्ये प्रभारी मुख्याधिकारीदेखील उपलब्ध नसल्याने शहराच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसते.

संपादन – विवेक मेतकर

Buldhana: In the first rain, the cleaning of the municipality was blown up

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here