भिलार : महू धरणात गुरे चारण्यासाठी आले असता, पोहताना प्रणव संतोष गोळे (वय 12) हा मयत झाल्याची घटना घडली. अद्याप प्रणव याचा मृतदेह सापडला नसून महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान त्याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
महू (तालुका जावली) या धरणात सोमवारी महू गावातीलच शिवराम नारायण गोळे हे आपला नातू प्रणव संतोष गोळे याच्यासोबत गुरे चारण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास शिवराम गोळे हे रस्त्याला लागूनच गुरे चारत होते.
गुरांना पाणी पाजून आजोबा रस्त्याकडे निघाले होते, परंतु प्रणव हा त्याच दरम्यान धरणाच्या पाण्याकडे धावत जात होता. आजोबांनी आवाज दिला, परंतु तो तसाच पळत होता. प्रणव पळत पाण्याकडे गेला आणि कपडे काढून त्याने पाण्यात उडी घेतली.
आजोबांनी लगेच पुण्याला असलेला आपला दुसरा मुलगा अजित शिवराम गोळे याला कळवले. त्याने लगेच गावातील लोकांना सांगितले. त्यावेळी गावातील युवकांनी धरणाच्या दिशेने धाव घेतली. त्याचा शोध घेतला, परंतु प्रणव सापडत नसल्याने लगेच महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना पाचारण केले.
आता दोन दिवस उलटले, तरी अद्यापही प्रणव सापडला नसल्याने कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान त्याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here