अकोले : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने वन विभागाने भंडारदरा- कळसूबाई अभयारण्यात कोरोना नियमांचे पालन करत पर्यटकांना मंगळवारपासून (ता. ८) सकाळी सात ते सायंकाळी सातदरम्यान प्रवेश देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे २५ जुलैपर्यंत पर्यटकांना लखलखणाऱ्या काजव्यांचा निसर्गाविष्कार पाहण्याची संधी तब्बल दोन वर्षांनी मिळणार आहे. या निर्णयाने निसर्गप्रेमी, पर्यटक व स्थानिक आदिवासींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दर वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या व जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भंडारदरा- कळसूबाई अभयारण्याच्या परिसरात काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. पावसाळ्याची चाहूल लागताच अंधारातील काजव्यांची लखलखती दुनिया अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या दिशेने वळतात. मात्र, यंदा काजवा महोत्सव कोरोनाच्या सावटाखाली होता. परिणामी, तो दुसऱ्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय वन्य जीव विभागाने घेतला होता. (Permission was granted for the Kajava Festival in Akola)

Also Read: परवड थांबणार : राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे मिळणार ऑनलाइन
आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. राज्य शासनाने निर्बंधही शिथिल केले आहेत. दोन वर्षांपासून वन विभागालाही पर्यटकांच्या प्रवेशशुल्कातून मिळणारे उत्पन्न मिळणे बंद झाले होते. आदिवासींचा रोजगारही बुडत होता. त्यामुळे वन्य जीव विभागाने अभयारण्यात मोजक्याच पर्यटकांना एका वेळी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
वन विभागाचे वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळ व परिसरातील गावांच्या सरपंचांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने साडेतीनशे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
थर्मल स्क्रिनिंगनंतरच अभयारण्यात प्रवेश
कोरोनाची लाट ओसरल्याने पर्यटकांना कळसूबाई-भंडारदरा अभयारण्यात प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वी प्रत्येक पर्यटकाचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. एका स्पॉटवर २५ व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा वन विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिला आहे. (Permission was granted for the Kajava Festival in Akola)
Esakal