आज सकाळी गूगलवर माहिती शोधता-शोधता गुगलच्या डूडलवर लक्ष गेले. त्या गुगलच्या आकर्षित चित्रावर टॅप करून पाहिले तर एका सुंदर गोड मुलीचे छायाचित्र येत होते. आणखी थोडी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तर, ती मुलगी हॉलिवूड पटातील पहिली बालकलाकार होती.
शर्ली टेंपल असे ह्या सुंदर बाल अभिनेत्रीचे नाव. शर्ली टेंपलचा जन्म 23 एप्रिल 1928 रोजी झाला. अतिशय कमी वयात अभिनेत्री म्हणून तिला प्रसिद्धी मिळाली. आपल्या वयाच्या दहा वर्षाच्या आत ती बालकलाकार म्हणून उदयास आली. गुगलने आज तिचे स्मरण करण्याचे कारण म्हणजे, आजच्याच दिवशी, 9 जून 2015 रोजी शर्लीच्या आठवणीत सांता मोनिका हिस्ट्री म्यूझियमने ‘लव्ह शर्ली टेंपल’ या संग्रहालयाची सुरुवात झाली होती. यात शर्लीच्या काही स्मृती जपून ठेवण्यात आलेल्या आहेत.

शर्ली टेंपलने वयाच्या चौथ्या वर्षापासुन बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केली. आणि वयाच्या सहाव्या वर्षी तिला अकादमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ‘स्टँड अप अँड चीयर’ आणि ‘ब्राइट आइज’ या सोबत अनेक चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले. वयाच्या 21 वर्षापर्यंत तिने चित्रपटात काम केले. आणि, यशस्वी अमेरिकन अभिनेत्री, गायिका, नृत्यांगना म्हणून नावलौकिक मिळविले.
कॅलिफोर्निया मध्ये जन्म झालेली शर्ली टेंपल ही आई वडीलांचे तिसरे अपत्य होते. शर्लीच्या आईची स्वतःची बॅले डान्सर होण्याची खूप इच्छा होती, परंतु स्वतःच्या कमी उंची मुळे ती डान्सर होऊ शकली नाही. आपले राहिलेले स्वप्न तिने आपल्या मुलीच्या माध्यमातुन म्हणजे शर्लीच्या माध्यमातून पूर्ण केले.

शर्लीने वयाच्या तिसऱ्या वर्षीपासून डान्स शिकण्यास सुरुवात केली. डान्स शिकत असताना एका दिग्दर्शकाने तिला पाहिले आणि ऑडिशनसाठी बोलाविले. शर्ली टेंपलचा ‘पावर्टी रो’ हा पहिला सिनेमा होता. त्यानंतर, मिळालेल्या ‘ब्राइट आय’ या सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली. शर्ली इतकी लोकप्रिय झाली की, दोन वर्षातच तिला संपूर्ण हाॅलिवूड ओळखू लागले.
शर्ली टेंपलने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी हाॅलिवूड मधून निवृत्ती घेतली. पुढील आयुष्य तिने जनतेच्या सेवेत अर्पण केले. 1969 मध्ये अमेरिकेने शर्ली टेंपलला संयुक्त राष्ट्रांत अमेरिकेचे प्रतिनिधित्व करण्यास नियुक्त करण्यात आले होते. राजकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर घाना मध्ये राजदूत म्हणून काम केले. त्यांनंतर तिला विदेश विभागात प्रोटोकोलची पहिली महिला प्रमुख म्हणून निवडण्यात आले होते. तर, 1988 मध्ये मानद विदेश सेवा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर विषयी सुद्धा शर्ली टेंपल आपले विचार मांडत होती.

शर्ली टेंपलची अभिनयातील कारकीर्द जितकी लोकप्रिय होती तितकीच राजकीय कारकीर्द सुद्धा. राजकीय कारकीर्द सुरू झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी अर्पण केले. वयाच्या 85 व्या वर्षी तिचे 10 फेब्रुवारी 2014 रोजी निधन झाले.
अशी ही गोड अभिनेत्री शर्ली टेंपलला पाहिल्यावर आपल्या राज्यात पार्लेजीच्या बिस्कीट कव्हरवर असणारा छोटी मुलगीच मला आठवली. आपल्या भारतीय सिनेमात अनेक बालकलाकारांनी काम केले. परंतु इतकी मजल क्वचितच कुणीतरी मारली असेल. आज गूगल मुळे शर्ली टेंपल बद्दल माहिती समजली आणि वाटले तुमची सुद्धा तिच्याशी ओळख करून द्यावी. नाही का?
Esakal