पुणे – एन-९५ सारख्या मास्कवरील (Mask) विषाणूला (Virus) नष्ट करण्यासाठी बाष्पीकरण, (Evaporation) यूव्ही किरणे (UV Rays) यांचा वापर करत मास्कचा पुन्हा वापर (Reuse) करणे शक्य असल्याचे सायन्स डायरेक्टच्या ‘एनव्हायरंमेंटल चॅलेंजेस’ या शोधपत्रिकेत एका संशोधनातून (Research) पुढे आले. तसेच नैसर्गिक प्रथिने (प्रोटीन) किंवा बांबू, केळी, कमळ, निवडुंग आदींच्या तंतूंचा वापर करून विघटनशील मास्कची निर्मिती होऊ शकते. (Recycling of Masks Possible)

देशात दर आठवड्याला चार हजार ६०० दशलक्षपेक्षा अधिक मास्कच्या कचऱ्याची निर्मिती होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. सर्जिकल मास्क, एन ९५, कापडी मास्क व इतर प्रकारच्या अनेक मास्कचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. यानंतर ‘मास्कच्या वापरानंतर पर्यावरणावर होणाऱ्या परिणामां’चा अभ्यास करण्यात आला. यामध्ये भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन व सिंगापूर या देशांमधील मास्क वापराचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. हा अभ्यास ऑस्ट्रेलियाच्या आरएमटी व स्वीनबर्न विद्यापीठातील पाथमंथन राजीव, सतीशकुमार नवरत्नम यांच्या समवेत श्रीलंकेच्या विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

पर्यावरणावर होणारा परिणाम

  • मास्कची योग्यरीत्या विल्हेवाट न लावल्याने जमिनीसह पाण्यातील जैवविविधतेवर परिणाम

  • मास्कच्या कचऱ्याचा पक्षी-प्राणी जीवनाला धोका

  • मास्कचे उत्पादन कार्बन उत्सर्जनास कारणीभूत

  • परिणामी जागतिक तापमान वाढीवर होऊ शकतो

अभ्यासातील ठळक बाबी

  • मास्कमुळे मायक्रो प्लॅस्टिकची निर्मिती

  • ८० टक्के नागरिकांकडून मास्कचा रोज वापर

  • देशात मास्कमुळे आठवड्याला सुमारे १२ हजार टन पॉलीप्रोपीलीन

  • २५ टक्क्यांहून अधिक लोक दर आठवड्याला ५ पेक्षा जास्त मास्क वापरतात

  • एन ९५ व सर्जिकल मास्कच्या उत्पादनात प्रोपीलीन, अॅल्युमिनियम आणि पॉलीप्रॉपिलीनच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्त

या कचऱ्याला कमी करण्यासाठीचे पर्याय

  • ‘मास्क रोटेशन’च्या माध्यमातून मास्कचा पुनः वापर

  • विषाणूला नष्ट करण्यासाठी बाष्पीकरण, यूव्ही किरणे यांचा वापर करत एन ९५ सारख्या मास्कचा फेरवापर

  • मास्कमधील ‘थर्मोप्लॅस्टिक’ला वितळून त्यातून विविध गोष्टी तयार करणे

  • पर्यावरणात विघटित होणाऱ्या मास्क निर्मितीसाठी बांबू, केळी, कमळ, निवडुंग आदींच्या तंतूंचा वापर

  • फेकलेल्या मास्कचा फेरवापर करत टिकाऊ विटांच्या निर्मिती शक्य

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here