‘मुळात राजकारण माझा पिंड नाही. सामाजिक कामात समाधान होते; परंतु बाळासाहेब आपटे यांच्या आग्रहास्तव राजकारणात आलो असं चंद्रकांत पाटील म्हणतात.
मुलाखतः आशीष तागडे
‘‘राजकारणात येण्याचा विचार नव्हता. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत राष्ट्रीय स्तरावर काम केल्यानंतर बाळासाहेब आपटे यांच्या आग्रहास्तव राजकारणात आलो. नेत्यांची इच्छा हीच आज्ञा मानून आजपर्यंत काम करत आलोय आणि यापुढेही करत राहीन…’’ हे मनोगत आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे. ‘वाढदिवसाच्या दिवशी समाजातील ‘नाही रे’ ना गटाला मदत करा, समाजभान जपा’ असा संकल्प करणारे पाटील यांची वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सकाळी लवकर सुरू झालेला दिवस मध्यरात्री मावळतो. कार्यकर्त्यांचा गराडा, मुंबईला जाण्याची घाई आणि तत्पूर्वी मतदार संघ, पुण्यातील कामांचे नियोजन अशा धावपळीतही पाटील यांनी त्यांचा सामाजिक,राजकीय प्रवास ‘सकाळ’ला उलगडून सांगितला.
‘‘आम्ही मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातले,’’ असे सांगून पाटील म्हणाले, ‘‘वडिलांनी गिरणीत नोकरीसाठी मुंबई गाठली. माझा जन्म मुंबईचा, तिथेच वाढलो. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी (अभाविप) संपर्क आला. १९८०मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. ठाण्याजवळील पालघर येथे आदिवासी भागातील सेवाकार्यात भाग घेतला.आसाम, पंजाबात काम करत असताना तेथील स्थिती जवळून पाहिली. पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून तेरा वर्ष काम केल्यानंतर परिषदेचा अ.भा. सरचिटणीस म्हणून जबाबदारी मिळाली. या काळात देश पालथा घातला. माझ्याकडे देशातील जातीय स्थिती, महिलांची परिस्थिती आणि आर्थिक दुर्बल घटकांचा अभ्यास करण्याची जबाबदारी होती. जाती आणि महिलांच्या समस्यांचं वास्तव बघून अस्वस्थ झालो. त्यातूनच पुढे समाजातील या घटकांबद्दल अधिक संवेदनशील बनलो.’’
Also Read: महाराष्ट्र तो बस झांकी है, दिल्ली अभी बाकी है !

राजकारणात प्रवेश
‘‘मुळात राजकारण माझा पिंड नाही. सामाजिक कामात समाधान होते; परंतु बाळासाहेब आपटे यांच्या आग्रहास्तव राजकारणात आलो. त्यावेळी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासारख्या सहकारी मित्रांचाही आग्रह होता. १७ वर्षे पक्षासाठी काम करतोय.’’ सत्तेतल्या कामाचा लेखाजोखा मांडतांना ते म्हणतात, ‘ देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे सत्तेत असताना आम्ही लोकाभिमुख धोरणे आखली. तशा योजना आणल्या. जलसिंचन प्रकल्प, रस्ते विकासाला प्राधान्य दिले. मराठा आरक्षणाचा निर्णय महत्त्वाचा होता. अनाथांना आरक्षणाचा निर्णयही घेतला. धनगर आरक्षणासाठीही ‘टीआयएसएस’च्या अहवालाचा आधार घेऊन समाजाची बाजू लावून धरली. मी मंत्री असताना ‘हॅपिनेस मंत्रालय’ अशी संकल्पना मांडली होती. जीवनाचा आनंद ही संकल्पना त्यात प्राधान्याने मांडलीय.’’
महाविकास आघाडीबद्दल
राज्य सरकारच्या कारभाराबाबत पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वास्तवाचे भान नाही. राज्यात गोंधळाची स्थिती आहे. पीक विमा घ्यायला कंपन्या समोर येत नाहीत. खरिपाचा विमा झालेला नाही. मराठा, ओबीसी आरक्षण याबाबत ठोस निर्णय नाहीत. सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवीत आहोत.’’ कोरोना केंद्र सरकारने प्रभावीपणे हाताळला; पण राज्य सरकारच्या बेपर्वाइमुळे गंभीर स्थिती निर्माण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्यामुळे ऑक्सिजन, इंजेक्शनचा पुरवठा मार्गी लागला. केंद्र सरकावर टीका करण्याऐवजी राज्य सरकारने कोरोनावर किती खर्च केला, याबाबत श्वेतपत्रिका काढावी. कोरोना काळात भाजपच्या माध्यमातून समाज मंदिरे व अन्य जागा घेऊन १६०० कोरोना केंद्र चालवली.’’
Also Read: हृदयात महाराष्ट्र…, नजरेसमोर राष्ट्र…!

वाढदिवसानिमित्त ‘समाजभान’
वाढदिवसाच्या निमित्ताने पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर वेगळी संकल्पना मांडली. याबद्दल ते सांगतात, ‘‘कोरोनामुळे कसोटी लागली आहे. वैद्यकीय सेवा आणि त्याचबरोबर रोजगारनिर्मिती आवश्यक आहे. आता अनलॉक होतेय. पोटापाण्यासाठी सगळी माणसे बाहेर पडणार. त्यांच्या लसीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत खासगी रुग्णालयात आम्ही सुमारे बाराशे लसींची नोंदणी केली. त्याचा लाभ गरजूंना करून देणार आहोत. त्याचबरोबर रिक्षाचालकांना एक हजार रुपयांचे ‘सीएनजी’चे कुपन देणार आहोत. यातून त्यांचे अनेक दिवस बंद असलेले काम सुरू व्हावे, हा हेतू आहे.’’
भाजपचे समाजकार्य
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लोकांसाठी अनेक उपक्रम राबवल्याचे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘पहिल्या लॉकडाउनमध्ये पाचशे तर आता साडेचारशे जणांना माणसी प्रतिमहिना पाच हजार रुपयांचा रोजगार उपलब्ध करून दिला. समाधानाची बाब म्हणजे ५०० पैकी २०० मुले त्या कामांवर कायम झाली आहेत.’’ अनेक घरांतून कोरोना काळात मुलांसाठी वारभर कापडही घेता आले नाही. त्यांना आम्ही ड्रेस शिवून देतो आहोत. हे काम महिला टेलरकडून करून घेणार असून त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल. या निमित्ताने एक हजार जणांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा संकल्प आहे. स्कूलबस चालकांसाठी योजना तयार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रीय राजकारणात जाण्याबाबत पक्षाचे नेते काय निर्णय घेतील तेच मला मान्य आहे. ‘नेत्याची इच्छा, ही तर आज्ञा,’ या धोरणाचा मी पाईक आहे.
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
Also Read: ‘राहुल गांधी यांच्यासमोर शेवटचा पर्याय; भाजपात प्रवेश करावा’

प्रदेशाध्यक्ष म्हणून…
राज्य सरकार त्यांच्या कर्माने पडणार आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकीच्या तयारीला लागा, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सांगितले आहे, असे पाटील म्हणाले. ‘‘आम्ही बूथ पातळीपर्यंत नियोजन करतोय. त्यासाठीचे प्रशिक्षणवर्गही सुरू आहेत. कार्यकर्त्यांबरोबर पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनाही प्रशिक्षण दिले जात आहे. त्याशिवाय दोनशे युवा नेत्यांसाठीही विशेष प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. पक्षाचा विस्तार होतांना सर्व नव्या सहकाऱ्यांना पक्षाची कार्यपद्धती, विचारधारा समजून देण्यावर भर राहील. युवकांनी संघटन बांधतांना ‘समाजभान’ही जपले पाहिजे. नवीन नेतृत्व घडवतांना ‘केडर प्युरिटी’ हे प्रमुख उद्दिष्ट आहे.’’
Also Read: महाविकास आघाडीमुळे शेतकऱ्यांऐवजी पीक विमा कंपन्या मालामाल
• छंद – दोस्ती करणे
• आवडते पुस्तक – स्वामी
• आवडती भाजी – अख्खा मसूर
• आवडते गाणे – कोळीगीतं आवडतात (मुंबईत स्वतःचे कलापथक होते)
• जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग – यशवंतराव केळकर यांनी अभाविपमध्ये आणले.
पुण्यात २४ तास पाणी पुरवू
आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न
कर्करोगावर उपचारासाठी ९०० बेडचे रुग्णालय
सध्या १५०० कर्मचारी आरोग्ययंत्रणेत; ही संख्या ५००० करण्याचा प्रयत्न.
पुण्याला चोवीस तास पाणी पुरवठ्याचे काम सुरू. त्यातील ९० पैकी ६० टाक्यांचे काम पूर्ण
कोरोनामुळे मंदावलेला मेट्रोच्या कामाचा वेग वाढवणार.
जायका प्रकल्प काम पूर्णत्वास नेणार.
प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना प्राधान्याने राबविणार
• कोथरूडबाबत …
रोजगाराची निकड असणारा गरजू आणि कौटुंबिक गरज असलेला मध्यमवर्ग यांच्यासाठी स्वतंत्रपणाने योजना
ज्येष्ठ नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यांना सेवा पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा
तरुणांच्या रोजगार वाढीसाठी कौशल्य आणि प्रशिक्षणाचे प्रयत्न सुरू
Esakal