मंडणगड : ब्रम्हकमळ हे फुल आपल्याला सहजच कुठे पहायला मिळत नाही. पांढरेशुभ्र आणि मंद सुगंधित असणारे सुंदर फुल पाहण्याची अनेकांची इच्छा असते. मंडणगड शहरातील दिलीप मराठे यांच्या बिल्वदलमध्ये हा दुर्मिळ सोहळा पाहण्याची संधी दरवर्षी हमखास उपलब्ध होते. (ता. ९) जून रोजी घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला मुक्तपणे वाढू दिलेल्या ब्रह्मकमळावर एकाच वेळी ३३ फुलांचा बहर आला. त्यामुळे परिसर पांढऱ्याशुभ्र फुलांनी आणि मंद सुगंधाने भारून गेला. हा अवर्णनीय सोहळा फेसबुक व व्हाट्सएप ग्रुपवर मित्रपरिवाराने लाईव्ह पाहिला.

दिलीप मराठे हे पदवीधर शिक्षक आहेत. त्यांचे सूर संगीतासह निसर्गावर अत्यंत जीवापाड प्रेम. आपल्या बिल्वदल घराच्या सभोवतालच्या एक गुंठा जागेवरील परिसरात फुलझाडे, फळझाडे, भाज्या यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. त्यात ते विविध प्रयोग करीत असतात. पूर्णतः सेंद्रिय पद्धतीचा अवलंब त्यांनी केला असून जणू सेंद्रिय शेतीची प्रयोगशाळाच उभारली आहे.

Also Read: रत्नागिरीकरांना लॉकडाउनमधून शिथिलता; प्रशासनाचे नवे आदेश जारी

पाच वर्षांपूर्वी ब्रम्हकमळाचे पान त्यांनी लावले. त्याला शेणखत, गोमूत्र दिले. जिवामृताचा वापर केला. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात वाढले. चार वर्षांत त्यावर सुमारे ३०० पेक्षा अधिक फुले फुलली आहेत. ब्रम्हकमळ हा निवडुंगाचा एक प्रकार. या झाडांची पानं खोडात रूपांतरित होतात आणि त्यांनाच कळ्या येतात. फुलांचा देठ लाल रंगाचा असतो. हे खोडच अन्न तयार करण्याचं काम करतं. ब्रम्हकमळाचा पांढरा शुभ्र रंग आपल्याला पटकन आकर्षित करतो. हे फुल मोठं पण खूपच नाजूक असतं. या फुलाच्या मऊ मुलायम आणि काहीशा पारदर्शक पाकळ्या मन मोहून टाकतात. बुधवारी दुपारनंतर मराठे यांना झाडावरील कळ्या पाहिल्यानंतर त्या फुलोऱ्यावर आल्याचे लक्षात आले. रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांचा आकार हळूहळू वाढत गेला. बारापर्यंत या कळ्या पूर्ण फुलल्याने झाड पांढरीशुभ्र फुलांनी झाकले गेले. त्यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून सर्वांना संदेश पाठवला. फुल फुलण्याचा अवर्णनीय सोहळा रात्रीची शांतता, पावसाच्या रिमझिम सरीं अशा सुंदर वातावरणात दहा व्हाट्सएप ग्रुपवर व फेसबुकवर शेकडो मित्रपरिवाराने अनुभवला. मराठे यांनी सेंद्रिय उत्पादन घेतलेल्या फुलं, फळ, भाज्यांच्या अनेक प्रयोगांच्या चित्रफिती पार्श्वसंगीतासह बनवल्या आहेत.

ब्रह्मकमळाच्या फुलाच्यामध्ये असंख्य पुंकेसर आणि त्याचे तंतू असतात. या पुंकेसरांच्या मधोमध असतो कुक्षीवृंत. कुक्षीवृंताच्या टोकाशी असणा-या चांदणीसारख्या कुक्षीपण फुलासारख्याच वाटतात. ब्रम्हकमळ रात्री पूर्णपणे उमलतं, हे त्याचे मुख्य वैशिष्टय आहे. पूर्ण उमलल्यावर त्याचा मंद सुगंध सगळीकडे पसरतो. शिवशंकर महादेवाला हे फुल अतिशय प्रिय आहे.

Also Read: World Vision Day: देशभरात चार लाख दृष्टीहीन व्यक्तींना नेत्रपटलाची गरज

“ब्रह्मकमळ दर्शन ही गार्डन प्रेमींसाठी (garden lovers) साठी पर्वणीच असते. अतिशय सुंदर व दुर्मिळ असे पांढरे शुभ्र फुल रात्री १२ वाजता पूर्ण फुलते. घरी एखादे फुल उमलले तरी स्वर्गीय आनंद होतो. आज माझ्या परसबागेत एका वेळी जवळजवळ ३३ फुले उमलली.”

– दिलीप मराठे

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here