नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं या मागणीवर शिवसेनेचे नेते आडून बसले आहेत. तर नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे नेते असलेल्या दि बा पाटील यांचे नाव या विमानतळाला दिले गेले पाहिजे या मुद्द्यासाठी नवी मुंबईतील विविध गावांतील नागरिक आणि स्थानिक आमदार आग्रही आहेत. याच मागणीसाठी नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध गावातील नागरिकांनी, ग्रामस्थांनी, आगरी व कोळी बांधवांनी मानवी साखळी आंदोलन केले.दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावं या मागणीसाठी सर्वत्र मानवी साखळी आंदोलन केलं जातंय. यासाठी साखळी आंदोलनासाठी स्थानिक, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र एकत्र आले आहेत. दिबा यांचा त्याग मोठा आहे त्यामुळे त्यांना त्यांचा बहुमान मिळावा, अशा भावनेने आंदोलन करण्यात आले.पक्ष किंवा सर्वोच्च नेता याचा विचार न करता सर्व पक्षातील स्थानिक नेते आज भूमिपुत्र म्हणून एकत्र आले आहेत.मानवी साखळी आंदोलन जासई ते उरण, विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन गव्हाण फाटा ते वडघर, ग्रामस्थांचे आंदोलन पनवेल ते बेलापूर सिडको भवन, नवी मुंबईकरांचे आंदोलन बेलापूर ते दिघा गाव, ठाणे जिल्ह्यावासीयांचे आंदोलन दिघा ते ठाणे येथे करण्यात आले. याशिवाय ठाणे शहर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मुंबई, पेण, अलिबाग, कर्जत इथेही मानवी साखळी आंदोलन झाले.या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही तर २४ तारखेला दि बा पाटील यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सिडको कार्यालयाला घेराव घातला जाईल आणि भव्य दिव्य आंदोलन केलं जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला.जासई, रांजनपाडा, धुतुम, एकटघर, चिरले, वेशवी, जांभूळपाडा, दादरपाडा, दिघोडे, विधणे, कंठवली, टाकीगव, मोटेभोम आदी गावांनी जासई दास्तान फाटा या ठिकाणावरून मानवी साखळी तयार केली. विविध गावांमध्ये अशा प्रकारे आंदोलन केलं गेलंलोकनेते दि बा पाटील यांच्या नावाने सर्व प्रकल्पग्रस्त व स्थानिक घोषणा देत होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिबांचे, अशा प्रकारच्या घोषणा लोक देताना दिसले.